लोकमत न्यूज नेटवर्क लातूर/सोलापूर/अमरावती/वर्धा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लागू असले तरी रुग्णांची संख्या वाढतेच आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर, लातूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कडक निर्बंध आधीच लावण्यात आले आहेत. या काळात वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने खरेदीसाठी येथे नागरिकांची एकच गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कडक संचारबंदी
सोलापुरात ८ मेच्या रात्री ८ वाजल्यापासून १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. या दरम्यान वर्तमानपत्रे, बँका तसेच मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता किराणा, भाजीपाला, दूध डेअरी या सेवा बंद राहतील. मार्केट यार्डही बंद राहील. पासधारक दूध विक्रेत्यांना घरपोच दूध विक्री करता येईल. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या आठवड्यात रमजान ईद असल्याने ईद काळात संचारबंदी शिथील करा, अशी मागणी शहरातील विविध मान्यवरांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
गर्दीमुळे रस्ते जाम
लातूर जिल्ह्यात ८ ते १३ मे या कालावधीत निर्बंध आणखी कडक करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गंजगोलाई, आडत बाजार, भुसार लाइन, किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. सहा दिवसांच्या काळात केवळ वैद्यकीय सेवा चालू राहील. अन्य आस्थापने, किराणा, भाजीपाला दुकानेही बंद राहतील. खरेदीसाठी गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दी एवढी वाढली की, शहरातील अनेक रस्ते जाम झाले होते. बऱ्याच दिवसांनंतर शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळाली.
पेट्रोलपंपांवर रांगा
वर्धा जिल्हा प्रशासनाने ८ ते १३ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू केले आहेत. फक्त रुग्णालये व औषधांचीच दुकाने सुरू राहणार आहेत. बाकी संपूर्ण व्यवहार बंद राहणार असून पार्सल सुविधा देण्याची मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्वच बाजारपेठांमध्ये सकाळी ८ ते ११ या कालावधीत तोबा गर्दी झाली होती. पेट्रोलपंपही बंद राहणार असल्याने सकाळी ६ वाजतापासून नागरिकांनी पेट्रोलपंपावर गर्दी केली होती. ६ तास या रांगा कायम होत्या. दुकानांमध्ये गर्दी होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. बऱ्याच दिवसांनंतर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
रविवारपासून कठोर संचारबंदी
अमरावती जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून १५ मे रोजी रात्री १२ पर्यंत कठोर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान जीवनावश्यक वस्तूची खरेदी ऑनलाइन करावी लागणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी झुंबड उडाली होती. बाजार समिती, आठवडी बाजार, भाजी मार्केट बंद असेल. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सुरू असेल.