मुंबई : राज्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा सुरू झाल्यामुळे मंगळवारी मुंबईकरांनी बाजारपेठांमध्ये धाव घेतली. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. त्यामुळे डी-मार्ट, सुपरमार्ट आणि किराणा मालाच्या दुकानांसमोर लांबलचक रांगा लागल्या होत्या.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन लावल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने घरातील अन्नधान्याचा साठा संपल्यानंतर बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही अडचण लक्षात घेऊन किराणा मालाची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली; परंतु अंतर निमयांच्या अंमलबजावणीमुळे दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागले. सकाळी रांग लावल्यानंतर रात्रीपर्यंत नंबर लागे, अशी स्थिती होती. आता पुन्हा लॉकडाऊन लावल्यास अशी बिकट वेळ ओढवू नये, यासाठी लॉकडाऊनच्या चर्चा सुरू होताच नागरिकांनी बाजारपेठा गाठल्या.
मुंबईतील प्रत्येक डी-मार्टसमोर मंगळवारी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. घरात किराणा भरण्याच्या धडपडीत नागरिकांना अंतर नियमांचेही भान नव्हते. काही ठिकाणी रांगेत घुसखोरीवरून कडाक्याचे भांडण झाल्याचे प्रकारही घडले. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने काही भागांतील डी-मार्ट बंद करण्याच्या सूचना पोलिसांना कराव्या लागल्या.
दादर मार्केटमध्ये तर सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली होती. गुढीपाडव्याचे निमित्त असले तरी भाजीपाला आणि नारळ, सुके खोबरे यांसह इतर रास्त दरात मिळणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल होता. अरुंद गल्ल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते. अंतर नियम पाळण्याच्या सूचना ध्वनीक्षेपकाद्वारे केल्या जात होत्या; परंतु लॉकडाऊनच्या भीतीने बाजारात उसळलेल्या गर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता.
* मसाला मार्केटकडेही धाव
लालबागच्या मसाला मार्केटमध्येही गर्दी पहावयास मिळाली. किमान तीन महिने पुरेल इतका मसाला ग्राहकांनी खरेदी केला. लाल-तिखट, भाजणीचा मसाला, लसूण चटणी मसाला, गरम मसाल्यासह खडे मसाले यांना अधिक मागणी होती, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. मशीद बंदर, भेंडीबाजार, भायखळा मार्केटसह स्थानिक बाजारपेठांमध्येही ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले.