- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : राज्य सरकारच्या ‘ब्रेक दी चेन’ला व्यापारी संघटनांनी शनिवारी ‘शटर डाऊन’ ठेवून सहकार्य केले; पण काही मद्याच्या दुकानांसमोर आलेले मद्यप्रेमी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मेडिकल, तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांचा आधार घेत त्याठिकाणी गर्दी करतात. ज्याचा औषध विक्रेत्यांना मनस्ताप होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.मालवणीच्या गेट क्रमांक १ येथे एका मद्याच्या दुकानाजवळ असलेल्या मेडिकल दुकानासमोर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास गर्दी दिसली. त्यानुसार ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही औषध विक्रेत्यांशी संपर्क साधला असता वाइन शॉप्सकडून होम डिलिव्हरी मिळत नसून ग्राहकांना दुकानाजवळ असलेल्या हॉटेल किंवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनाकडे बोलावून दारू दिली जात आहे, तसेच पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. परिणामी, मेडिकल दुकानांसमाेर गर्दी होते आणि औषधे खरेदीसाठी येणाऱ्यांना मनस्ताप हाेताे, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकारच्या ‘ब्रेक दी चेन’ नियमावलीनुसार मद्याची होम डिलिव्हरी दिली जाईल, त्यामुळे दुकानासमोर ग्राहकांनी गर्दी करू नये. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत गर्दी कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे तो अपयशी ठरेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चिंचोली बंदर येथेही ‘लपाछपी’- मालाडच्या चिंचोली बंदर, सुंदरनगर परिसरात असलेल्या एका वाइन शॉपसमोर दुपारी दीडच्या सुमारास दहा ते पंधरा जण गोळा झाले होते. त्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. त्यामुळे पोलिसांसोबतची ही लपाछपी याठिकाणीही पाहायला मिळाली.