Join us

बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:09 AM

मुंबई - कोविडचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे बेस्ट बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दररोज ...

मुंबई - कोविडचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले. यामुळे बेस्ट बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता २५ लाखांवर पोहोचली आहे; मात्र बसमधून उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे; परंतु बसमधून उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अलीकडे वाढल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा वाजत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात येऊ लागल्यानंतर जून महिन्यापासून बेस्टला पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली; मात्र उभ्याने प्रवासी वाहून नेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर तिष्ठत राहावे लागत होते. आता कोविड प्रतिबंधक दोन डोस घेतलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन

मात्र दोन्ही डोस न घेतलेल्या प्रवाशांना बेस्ट बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बस गाड्यांमध्ये गर्दी होत असून, प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. सध्या सुमारे २५ लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करीत आहेत. यामुळे कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत आहे. बेस्ट वाहनचालक आणि वाहकाने सूचना करूनही प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.

* जून महिन्यात १८ लाख प्रवासी दररोज बस गाड्यांमधून प्रवास करीत होते. मागील दोन महिन्यांत साडेसहा लाख प्रवासी वाढले आहेत.