बाजारपेठांत झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:49+5:302021-04-15T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा सुरू होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री त्याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला. मात्र, यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी बुधवारी सकाळीच बाजारपेठांत धाव घेतली. किराणामालासह दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने मुंबईतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
मुंबईतील सर्व किराणामालाची दुकाने, सुपर मार्केटमध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. डी-मार्टसमोर तर लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी टोकन पद्धतीने ग्राहकांना बोलावले जात होते, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष रांगेत उभे राहूनच सामान घ्यावे लागत होते. या साऱ्या धडपडीत कोणालाही अंतर नियमांचे भान नव्हते. पोटाच्या भुकेपुढे कोणाचेही शहाणपण चालत नाही, याचा प्रत्यय या गर्दीत येत होता. कांजुरमार्ग, चांदिवली, मुलुंडमधील डी-मार्टबाहेर रांगेत घुसखोरीवरून कडाक्याचे भांडण झाल्याचे प्रकारही निदर्शनास आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपले ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करीत असताना सर्वसामान्यांच्या रोषामुळे त्यांनाही रांगेत उभे राहून वाणसामान खरेदी करावे लागले. त्याचप्रमाणे गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसी बळाची मदत घेण्याची वेळही काही दुकानमालकांवर ओढावली.
दादर मार्केटमध्ये तर सकाळपासूनच गर्दीचा ओघ सुरू होता. भाजीपाला, नारळ, सुके खोबरे यासह इतर रास्त दरात मिळणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल होता. अरुंद गल्ल्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते. अंतर नियम पाळण्याच्या सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे केल्या जात होत्या. परंतु, लॉकडाऊनच्या भीतीने बाजारात उसळलेल्या गर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता. लालबागच्या मसाला मार्केटसह मशीदबंदर, भेंडीबाजार, भायखळा मार्केट आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही गर्दी पाहावयास मिळाली.
.............
गेल्यावर्षीच्या आठवणींनी काळजात धस्स...
गेल्यावर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन लावल्यामुळे प्रचंड हाल झाले. बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याने घरातील अन्नधान्याचा साठा संपल्यानंतर काही जणांवर उपासमारीची वेळ ओढावली. आता त्या प्रसंगाची आठवण आली तरी काळजात धस्स होते, अशी भावना चांदिवलीतील गृहिणी वर्षा पाटील यांनी व्यक्त केली. अशी बिकट वेळ पुन्हा ओढावू नये, यासाठी लॉकडाऊन जाहीर होताच तातडीने बाजारपेठ गाठल्याचे त्यांनी सांगितले.
................
संचारबंदी लागू केल्यामुळे पुढील १५ दिवस पोलीस बाहेर पडू देणार नाहीत. रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाऊन वाढवला जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने पुरेल इतका किराणामाल भरला. सकाळी ८ वाजता रांग लावली होती, दुपारी ३ वाजता नंबर आला. पण, पुरेसे सामान खरेदी करता आल्याने टेन्शन फ्री झालो.
-संतोष दळवी, मालाड
..............................
लॉकडाऊनकाळात किराणामालाची दुकाने उघडी राहणार असली, तरी भीतीपोटी घरात सर्व सामान भरले. कोरोनाकाळात कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण तयारीत असलेले बरे. पण, मुख्यमंत्र्यांनी आणखी काही वेळ दिला असता तर बाजारात इतकी गर्दी उसळली नसती.
-बाळाजी नाईक, गोरेगाव