मुंबईतील बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:06 AM2021-03-01T04:06:28+5:302021-03-01T04:06:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन करणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन करणे परवडणारे नसल्याने शासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईकर बाजारपेठ, मंडई, रेल्वे स्थानक, उद्याने, तसेच विविध पर्यटनस्थळे या ठिकाणी मोठी गर्दी करू लागले आहेत. मुंबईतील सर्व परिसरांमध्ये खरेदीसाठी मुख्य बाजार असलेल्या परिसरांमध्ये फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षा-टॅक्सीवाले तसेच इतर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
लॉकडाउनच्या काळात पुढे ढकलण्यात आलेले लग्नसमारंभ सध्या उरकले जात आहेत. यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या गर्दीतील अनेक नागरिक चेहऱ्यावर मास्क परिधान करत नसल्याने ही गर्दी कोरोनाच्या संसर्गाला कारणीभूत ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यानंतर कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
मुंबईत दररोज एक हजारच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
मुंबईत आता थंडी कमी होऊन ऊन वाढू लागले आहे. यामुळे ऊन कमी होताच मुंबईतील प्रमुख बाजारपेठा असलेल्या परिसरांमध्ये सायंकाळच्या वेळेस नागरिकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडते. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले या गर्दीचे प्रमुख कारण मानले जात आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बॉक्स
राणीच्या बागेतही गर्दी कायम
शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसांमध्ये मुंबईतील राणीच्या बागेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या गर्दीमध्ये नागरिक एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखत नाहीत. राणीची बाग बंद होण्याच्या वेळेस प्रवेशद्वाराच्या बाहेर नागरिक टॅक्सी किंवा बस पकडण्यासाठी एकच गर्दी करतात. यामुळे त्या ठिकाणी कोरोनाचा धोका निर्माण होत आहे.