मुद्रांक नोंदणी कार्यालयात गर्दी, सोशल डिस्टन्सिंग राहत नसल्याने कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:06 AM2021-04-02T04:06:52+5:302021-04-02T04:06:52+5:30
मुंबई : ३१ मार्च रोजी मुद्रांक शुल्क नोंदणीच्या सवलतीचा कालावधी संपल्याने या काळात मुद्रांक नोंदणी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ...
मुंबई : ३१ मार्च रोजी मुद्रांक शुल्क नोंदणीच्या सवलतीचा कालावधी संपल्याने या काळात मुद्रांक नोंदणी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या कार्यालयांमध्ये घरांची, जमिनीची दस्तनोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहत नसल्याने या ठिकाणी कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
चेंबूरच्या मनोरेल स्थानकाच्या येथील सहदुय्यम निबंधक कुर्ला यांच्या नोंदणी कार्यालयात सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत नोंदणी करण्यात येते. मात्र या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहत नाही.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ऑगस्ट २०२० मध्ये विकासकांना आपली मालमत्ता नोंदविताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आली होती. सुरुवातीला १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये मुद्रांक शुल्क नोंदणीत ३ टक्क्यांनी सवलत देण्यात आली होती. यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये मुद्रांक शुल्क नोंदणीत २ टक्क्यांनी सवलत देण्यात आली. या कपातीमुळे राज्यात कोरोना काळातही नागरिकांनी घरखरेदीला चांगला प्रतिसाद दिला.
नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणीचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांनाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ३१ मार्चनंतरदेखील नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कायम आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पाहता या ठिकाणी नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग राहावे यासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे.