गाेरेगावमधील स्त्यांवर गर्दी कमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवार व रविवार कडक लॉकडाऊनचे निर्बंध घातले आहेत. त्यानुसार शनिवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यांवर कमी गर्दी होती.
गोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची तुरळक गर्दी हाेती, तर गोरेगाव पूर्व बसस्थानकात साध्या व एसी बस उभ्या होत्या. प्रवासी कमी दिसत होते. साध्या बसच्या तुलनेत एसी बसला प्रवाशांची पसंती अधिक होती.
रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षा रांगेत उभ्या होत्या, तर स्टेशन परिसरातील दुकाने बंद होती.
गोरेगाव नागरी निवारा परिषद, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, गोरेगाव स्टेशन, हायवे, आरे चेक नाका ते अंधेरी पूर्व मरोळ-मरोशी डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्यावर वाहने कमी होती. अत्यावश्यक सेवेत येणारे मेडिकल शॉप, किराणा, दूध वितरण सुरू होते, तर इतर दुकाने व हॉटेल्स बंद होती.
सेव्हन हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर येथे उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना लागणाऱ्या वस्तूंचे पार्सल देण्यासाठी रुग्णांचे अनेक नातेवाईक रांगेत उभे होते.
* नेस्कोत लसीकरण सुरू
एकीकडे अनेक ठिकाणी लसीचा साठा संपला असताना, गोरेगाव पूर्व नेस्कोत लसीकरण सुरळीत सुरू होते. नेस्को कोविड सेंटरमध्ये १५,००० लसींचा साठा उपलब्ध असून, आणखी लसींचा साठा मिळण्यासाठी आमची गाडी गेली असल्याची माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
............................