रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:29+5:302021-02-14T04:07:29+5:30

मुंबई : लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. त्यात १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात ...

Crowds on the streets, masks Tata, will be chaotic? | रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का?

रस्त्यावर गर्दी, मास्कला टाटा, बेशिस्त भोवणार का?

Next

मुंबई : लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. त्यात १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आल्यापासून मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गर्दीमध्ये निम्म्या मुंबईकरांच्या नाका-तोंडावर मास्क नसतो. त्यामुळे मुंबईकरांचा हा बेशिस्तपणा सर्व नागरिकांना भोवणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल सुरू झाल्यापासून मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा कोरोनाचे नियम कठोर करावे लागतात की काय, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीदेखील संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नाक आणि तोंडावर मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक केले आहे. नागरिकांना मास्क वापराबाबत शिस्त लागावी यासाठी महानगरपालिका विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईदेखील करत आहे; मात्र तरीदेखील अनेक मुंबईकर घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत.

अनेक जणांच्या चेहऱ्यावरचा मास्क हा अक्षरशः नाक आणि तोंडाच्या खाली सरकलेला असतो. तर काही जण केवळ पोलिसांना व पालिकेच्या क्लिनअप कर्मचाऱ्यांना पाहिल्यावरच कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतात. यामुळे मास्कच्या वापराबाबत निम्मे मुंबईकर गंभीर नसल्याचे पाहायला मिळत आहे. बस आणि लोकलमध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारखी गर्दी होऊ लागली आहे. यामुळे एकमेकांमध्ये सुरक्षित अंतरदेखील राखले जात नाही. अनेक रेल्वे प्रवासी वेळेचा नियम न पाळता कोणत्याही वेळी रेल्वेने प्रवास करण्यासाठी पोलिसांशीदेखील वाद घालतात. दादर, कुर्ला क्रॉफर्ड मार्केट अशा मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर पुन्हा एकदा अनधिकृत फेरीवाले बसू लागल्याने गर्दी वाढू लागली आहे. यामुळे मुंबईकरांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर सतत करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Crowds on the streets, masks Tata, will be chaotic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.