बडोदाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मराठा संघटन संकुलाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 04:49 PM2020-12-13T16:49:01+5:302020-12-13T16:49:29+5:30
Maratha Organization Complex : येथील मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : बडोदा हे भारताच्या गुजरात राज्यातील एक प्रमुख शहर असून येथील श्रीमंत रणजितसिंह गायकवाड ( महाराजा बडोदा ) यांची कर्मभूमी आहे. या शहराची २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले बडोदा हे गुजरातमधील अहमदाबाद व सुरत खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर विश्वामित्री नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.
गुजरात मध्ये वडोदरा या नावाने प्रसिद्ध असलेले बडोदा शहर हे नेहमीच मराठी माणूस व महाराष्ट्र यांचे केंद्र बिंदू राहिले आहे. दि,15 फेब्रुवारी 2018 साली 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचा मान बडोद्याला मिळाला होता.
बडोदात मराठी माणसांची लोकसंख्या सुमारे साडेतीन ते चार लाख आहे. या शहरातील मराठी माणसांसाठी स्वतंत्र वास्तू नव्हती. या शहराचे दोन वेळा राहिलेले माजी महापौर व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बडोद्यात मराठा मंदिराची उभारणी केली.2018 साली चव्हाण यांनी सदर वास्तू ताब्यात घेतली आणि पंचवीस लाखांची देणगी या वास्तूसाठी दिली.
येथील मराठा मंदिराच्या उभारणीमुळे बडोद्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून येथील मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सुमारे सात हजार चौफूट जागेत दोन मजली आकर्षक वास्तू येथे उभारली असून भविष्यात तिसरा मजला येथे उभारला जाणार आहे. जय शिवराय संघटन आणि येथील मान्यवर मराठी बांधवांनी एकत्र येऊन ही वास्तू उभारली असल्याची माहिती रणजित चव्हाण यांनी लोकमतला दिली.
बडोदा येथील जय शिवराय संघटन तसेच मराठा समाजातील नागरिकांसाठी एकत्रित संघटन करून श्री मल्हार म्हळसाकांत मराठा मंगल कार्यालय व श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड संकुल व श्री रणजित श. चव्हाण मराठा मंदिराचे उदघाटन राजमाता शुभांगीराजे गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी रणजितसिंह गायकवाड (महाराजा बडोदा),समजित सिंह गायकवाड,आमदार सीमा मोहिले,चंद्रकांत श्रीवास्तव,माजी महापौर रणजित चव्हाण,रावसाहेब भोईटे,अरविंद खैरे,अनिल नवले,शशिकांत भेंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.