क्रूझप्रकरणी एनसीबी ॲक्शन मोडमध्ये; दक्षता पथकाकडून मुंबईत सर्च ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:28 AM2021-11-09T07:28:17+5:302021-11-09T07:28:36+5:30
मुंबई : कार्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबी ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एनसीबीच्या दिल्लीतील दक्षता पथकाने मुंबईत ...
मुंबई : कार्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबी ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एनसीबीच्या दिल्लीतील दक्षता पथकाने मुंबईत येत तीन ठिकाणी झाडाझडती घेतली. यातून तपासाला सहकार्य मिळणार असल्याचे पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.
सिंह यांच्या नेतृत्वात पथकाने आधी लोअर परळ येथे भेट दिली. तेथे पंच प्रभाकर साईलच्या आरोपानुसार, याच ठिकाणी अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा दादलानीची के. पी. गोसावीने भेट घेतल्याचे सांगितले होते. तेथून इंडियन हॉटेल येथे पथक गेले, या ठिकाणी प्रभाकर साईलने गोसावीच्या सांगण्यावरून पैसे स्वीकारल्याचे सांगितले होते. पुढे एनसीबीने कारवाई केलेल्या क्रूझ टर्मिनल इथे जाऊन पाहणी केली. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांनुसार या प्रकरणात ज्या ठिकाणी खंडणीची बोलणी झाली असा संशय आहे, त्या ठिकाणी दक्षता पथक पोहोचले होते.
आरोपांच्या चौकशीसाठी ही पाहणी महत्त्वाची असल्याचे सिंह यांनी सांगितले. तर दुसरीकडे, क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसह ६ प्रकरणांची चौकशी एनसीबीचे एसआयटी पथक करीत आहे. रविवारी प्रकृती ठीक नसल्याची सबब देत आर्यन खान एनसीबी चौकशीला गैरहजर राहिला. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वात एसआयटीचे पथक या प्रकरणी तपास करीत आहे. या पथकात १३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.