Join us

Sameer Wankhede: ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:51 AM

Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे आरोप सुरूच

मुंबई: क्रूझवरील ड्रग पार्टीवर (Cruise Drug Party) कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर दररोज गंभीर आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आता आयोजकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्या पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला (Kashif Khan) वानखेडेंनी अटक का केली नाही?, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. वानखेडे आणि काशिफ खान एकमेकांचे चांगले मित्र असल्यानंच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर आता वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखेडेंनी क्रूझ पार्टीवर छापा टाकून आर्यनला अटक केली. त्यावेळी क्रूझवर शेकडो लोक उपस्थित होते. मात्र आर्यनसह मोजक्या लोकांनाच ताब्यात घेण्यात आलं. फॅशन टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी पार्टी आयोजित केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. कारण ते वानखेडेंचे चांगले मित्र आहेत, असं मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले.

मलिक यांनी केलेल्या आरोपांना वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. कायदा आपलं काम करेल, अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली. मलिकांच्या आरोपांवर त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या असून एनसीबीनं त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडूनही त्यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी एका टीमची स्थापना करण्यात आली आहे.

मलिकांनी सांगितला बाकी असलेला पिक्चरआता परिस्थिती संपूर्णत: बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्सच आता बदलला आहे. धरपकड करणारे लोक आता बचावाचा मार्ग शोधत आहेत. म्हणूनच मी काल पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हटलं, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. जी व्यक्ती आर्यन खानला तुरूंगात घेऊन जात होती, ती आज स्वत: तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली आहे. जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती स्वत: काल कोर्टात दाद मागत होती. पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. ती सीबीआयकडे किंवा एनसीबीकडे वर्ग करण्याची मागणी ते करत आहेत, असंही मलिक म्हणाले. 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकआर्यन खान