मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आरोपी असलेल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयाने एनसीबीला ६० दिवसांची मुदतवाढ दिली. या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास सुरू असल्याने सोमवारी एनसीबीने विशेष न्यायालयापुढे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देण्यासंदर्भात अर्ज केला होता.
विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर एनसीबीला या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ दिली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागण्याकरिता भाग पाडणारी कारणे आहेत, असा युक्तिवाद एनसीबीने केला. क्रुझ ड्रग्सप्रकरणी आर्यन खानसह १९ जणांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती.
कोरोनामुळे झाला अहवालास विलंबया प्रकरणातील केमिकलचे १७ नमुने चाचणीसाठी पाठविले असता त्यांचे अहवाल १२ मार्च रोजी आले. त्यावरून पोलिसांनी जप्त केलेला माल हा ड्रग्स असल्याचे सिद्ध होते. नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोरोना असल्याने अहवाल मिळण्यास विलंब झाला, असे एनसीबीने अर्जात म्हटले होते. तसेच या घटनेचा पंच प्रभाकर साईल हा फितूर झाला. त्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रबाबतचा निर्णयही न्यायालयाने घेतलेला नाही. तसेच पहिला पंच साक्षीदार के. पी. गोसावी हा अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याचीही साक्ष अर्धवट राहिल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले.