Join us

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरण; NCBनं तीन जणांना सोडलं? मलिकांचा दावा, केला भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 1:34 PM

क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत.

मुंबई - क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरही काही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर गंभीर आरोप केला आहे. क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात NCBने एकूण 11 जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मलिक म्हणाले, क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले. एनसीबीने कुणाच्या निर्देशावरून या तिघांना सोडले? आम्ही एनसीबीकडे यासंदर्भात सत्य काय, याचा खुलासा करण्याची मागणी करत आहोत. समीर वानखेडे आणि भाजप नेते यांच्यात काही चर्चा झाली असावी, असे आम्हाला वाटते, असेही मलिक यांनी म्हटले आहे. 

मलिकांचे प्रश्न -क्रुझ ड्रग्स पार्टीच्या छाप्यातून ताब्यात घेतल्यानंतर केवळ तीन तासांत या तिघांना का सोडण्यात आले. या तीन तासांत त्यांची नेमकी कोणती चौकशी केली गेली? असे प्रश्नही मलिक यांनी एनसीबीला विचारले आहेत. याशिवाय, या संपूर्ण प्रकरणाचा तपास, कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅटवर अवलबून आहे. तर मग, सोडण्यात आलेल्या या तिघांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअॅप चॅट का तपासले नाहीत? असा सवालही मलिक यांनी एनसीबीला केला आहे. 

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खानभाजपा