मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम (Jurgen Bailom) यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखीही काही लोक ड्रग्स घेत असल्यासंदर्भात तपास केला जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री एनसीबीनं (NCB) मुंबईतील गोरेगाव परिसरात धाड टाकली. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकानं २ ऑक्टोबर रोजी क्रुझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान (Shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan arrested) याचाही समावेश होता. आता या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. यातील एकाला क्रुझवरील कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलं होतं. तर एका ड्रग पॅडलरला जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतलं होतं. त्या दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.