मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरील आरोपांवरून विरोधकांनी शुक्रवारी विधिमंडळात प्रचंड गदारोळ केला, तर सत्ताधारी आमदारांनी छगन भुजबळ-तेलगी संबंध व अण्णा भाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यांवरून विरोधकांना लक्ष्य केले. या गोंधळामुळे विधानसभेतील कामकाज उरकले गेले, तर विधान परिषद सोमवार-पर्यंत तहकूब झाली.विधानसभेच्या कामकाजाची वादळी सुरुवात झाली. पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर व डॉ. रणजीत पाटील यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाकीचे कामकाज बाजूला सारून मंत्र्यांवरील आरोपांवर चर्चा करा, असा आग्रह धरला. ‘कुठे हरवली तुमची नीतिमत्ता, लपवले शिक्षण आणि मालमत्ता’ अशा घोषणांचे फलक विरोधकांनी फडकवले. सत्ताधारी बाकांवरील सदस्य आक्रमक झाले. त्यांनीही मग ‘अण्णा भाऊ साठे महामंडळात घोटाळे करणारे रमेश कदम यांना अटक करा’ आणि तेलगीच्या संबंधांवरून विरोधकांना छेडणारे फलक झळकविले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सांसदीय कामकाज मंत्री प्रकाश महेता विरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्यात सभागृहात वाक्युद्ध रंगले.(विशेष प्रतिनिधी)
विधिमंडळ अधिवेशनात घोटाळ्यांवरून रणकंदन
By admin | Published: July 25, 2015 2:15 AM