- खलील गिरकरमुंबई - मुंबईहून २० सप्टेंबरला जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील केबिन प्रेशर प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे विमानातील १६६ प्रवासी व ५ क्रू मेंबर्सचे प्राण कंठाशी आले होते. या प्रकरणी नागरी विमान उड्डाण महासंचालकांच्या (डीजीसीए) विमान सुरक्षा संचालकांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्या विमानाच्या वैमानिकांनीच कर्तव्यात कुचराई केल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून अंतिम अहवाल देण्याची जबाबदारी आता विमान अपघात अन्वेषण (एएआयबी) विभागाकडे सोपविण्यात आली आहे.विमानातील केबिन प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी असलेली प्रणाली सुरूच न केल्याने १० हजार फूट उंचीवर गेल्यानंतर विमानातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले. परिणामी, केबिन प्रेशर प्रमाणापेक्षा कमी होऊन प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. काहींच्या नाकातून रक्त येऊ लागले होते. त्यानंतर वैमानिकांनी विमान वापीजवळून परत फिरवत मुंबई विमानतळावर उतरवले होते.हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन आशिष शर्मा, फर्स्ट आॅफिसर अहमर खान यांच्याकडील विमान उड्डाणाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून त्यांना ग्राउंड ड्युटी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जेटच्या वैमानिकांची कर्तव्यात कुचराई, प्राथमिक चौकशीतून उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:19 AM