खालापूर : खोपोलीसह खालापूर तालुक्याला शनिवारपासून अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवारी संध्याकाळी दाखल झालेला अवकाळी पाऊस रात्रभर कोसळल्यानंतर रविवारीही सुरुच राहिल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसाने अनेक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वीटभट्टी व्यावसायिकांचे तर या पावसाने कंबरडेच मोडले आहे.शनिवारी संध्याकाळी खोपोलीसह खालापूर तालुक्यात पावसाचे आगमन झाले. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस संपत असतानाच वातावरण बदलून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे आंब्याला आलेला मोहोर गळून गेल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पावसाने वीट उत्पादकांचेही मोठे नुकसान केले आहे. अगोदरच विटांना मागणी नसल्याने संकटात असलेले वीट उत्पादक या अवकाळी पावसाने कोलमडून गेले आहेत. अचानक आलेल्या पावसाने नवीन तयार केलेल्या विटांचे नुकसान झाल्याने वीट उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे.वाल उत्पादक शेतकऱ्यांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान केले आहे. लघुउद्योजकांना याचा मोठा फटका बसला आहे. शनिवारी सुरु झालेला पाऊस रविवारीही कोसळत होता. क्रिकेटचे सामनेही या पावसामुळे रद्द करण्यात आले. पावसामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. (वार्ताहर)
आंबा, वीट उत्पादकांवर अस्मानी संकट
By admin | Published: March 01, 2015 10:52 PM