खड्डे बुजविण्यात कंजुसी : मटेरियल नाही म्हणून खडी, पेव्हर ब्लॉकचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:50 AM2018-07-18T02:50:47+5:302018-07-18T02:51:05+5:30

शहर आणि उपनगरातील खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेवर टीका होत असतानाच, या टीकेला उत्तर देण्याऐवजी महापालिका या प्रकरणातून पळ काढत असल्याचे चित्र आहे.

To crush potholes: Stretch, pavement block, not as material | खड्डे बुजविण्यात कंजुसी : मटेरियल नाही म्हणून खडी, पेव्हर ब्लॉकचा मुलामा

खड्डे बुजविण्यात कंजुसी : मटेरियल नाही म्हणून खडी, पेव्हर ब्लॉकचा मुलामा

Next

मुंबई : शहर आणि उपनगरातील खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेवर टीका होत असतानाच, या टीकेला उत्तर देण्याऐवजी महापालिका या प्रकरणातून पळ काढत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेकडे खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाने अद्ययावत असे मटेरियल नसल्याने, प्रशासनाने कुर्ला पश्चिमेकडील कमानी जंक्शन येथील खड्डे भरण्यासाठी खडी आणि पेव्हर ब्लॉकचा आधार घेतला आहे. परिणामी, या कामावर स्थानिकांकडून टीका होत आहे.
कुर्ला पश्चिमेकडील ‘एल’ वॉर्डमधील खड्ड्यांवर ‘लोकमत’ने ‘खड्डे करून दाखविले’ या वृत्तमालिकेतून काल मंगळवारी प्रकाश टाकला. ‘मटेरियलअभावी कुर्ला गेले खड्ड्यांत’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका कामाला लागली. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेचे कर्मचारी कुर्ला पश्चिमेकडील कमानी जंक्शन येथे खडी आणि पेव्हर ब्लॉकने भरलेला टेम्पो घेऊन दाखलही झाले.
रिमझिम पावसात येथील खड्डे भरण्याचे कामही सुरू झाले. प्रत्यक्षात उत्तम दर्जाच्या साहित्याने येथील खड्डे भरले जातील, अशी आशा वाहन चालक आणि स्थानिकांना होती. प्रत्यक्षात मात्र, टेम्पोतून खडी आणि पेव्हर ब्लॉक खाली उतरविले गेले.
एकविशी; बाविशीतील तरुण खड्डे पडलेल्या घटनास्थळी फावड्याने खड्ड्यांतील माती आणि पाणी काढू लागले. पावसाचा जोर नसला, तरी रिमझिम पाऊस सुरूच होता, शिवाय मोठे जंक्शन असल्याने वाहनांची ये-जा देखील मोठ्या प्रमाणावर सुरू होती. कामात अडथळे येऊ नयेत, म्हणून येथील वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी त्यांच्या मदतीला वाहतूक पोलीसही तैनात होता. येथील खड्डे उत्तम दर्जाच्या साहित्याने भरले जातील, असा अंदाज असतानाच प्रत्यक्षात मात्र खड्ड्यांत खडी भरली गेली. त्यावर पेव्हर ब्लॉकाचा स्तर लावण्यात आला.
मुळात या जंक्शनवरचे सर्वच खड्डे पालिकेने असे भरले. आता पुन्हा जोराचा पाऊस झाला की, पुन्हा येथील खड्ड्यांतील साहित्य पावसाच्या पाण्याने वाहून जाईल आणि वाहनचालकांसह नागरिकांना त्रास होईल, असे कालिना विधानसभेचे भाजपाचे माजी सचिव राकेश पाटील यांनी सांगितले.
>पालिकेचा कानाडोळा : ‘एल’ वॉर्डमधील बहुतांशी खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने चक्क डेब्रिजचा आधार घेतला. डेब्रिजने खड्डे बुजविण्यात येत असल्याने, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विरोधात आवाजही उठविला होता. मात्र, महापालिकेने कोणाचेच काहीच ऐकले नाही. कमानी जंक्शन ते साकीनाका जंक्शन, तसेच असल्फा, लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडत असलेल्या नारायणनगर आणि चिरागनगरमधील रस्त्यांवरील खड्डेही डेब्रिजने भरले आहेत. आजघडीला या खड्ड्यांतील डेब्रिज रस्त्यांवर पसरले आहे. पसरलेल्या डेब्रिजमुळे वाहने घसरून अपघाताची भीती आहे. मात्र, याकडे महापालिकेने साफ कानाडोळा केला आहे.

Web Title: To crush potholes: Stretch, pavement block, not as material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.