एव्हीएच हटावसाठी रणकंदन

By admin | Published: March 20, 2015 12:10 AM2015-03-20T00:10:15+5:302015-03-20T00:10:15+5:30

रसायनमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि शेतजमिनीला प्रचंड धोका निर्माण झाल्याने हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवरून विधानसभेत रणकंदन पेटले.

Crushing for removal of AVH | एव्हीएच हटावसाठी रणकंदन

एव्हीएच हटावसाठी रणकंदन

Next

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील ए.व्ही.एच. प्रकल्पातून निघणारा धूर आणि नदीमध्ये सोडण्यात येत असलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला आणि शेतजमिनीला प्रचंड धोका निर्माण झाल्याने हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवरून विधानसभेत रणकंदन पेटले.
हा प्रकल्प रद्द वा बंद करता येणार नाही. मात्र, त्यापासून १ टक्काही प्रदूषण होणार नाही याची खात्री पटल्यानंतरच शासन तो सुरू करण्याची परवानगी देईल. आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामाला मंत्र्यांनी दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली होती.
अलीकडे प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू झाल्यानंतर संध्यादेवी कुपेकर यांनी आपल्याकडे प्रदूषणाबाबतची तक्रार केली तेव्हा आपण प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, असे कदम म्हणाले. तो सुरू झाल्यानंतर प्रदूषणावर मुंबईतून देखरेख ठेवली जाईल. १ टक्काही प्रदूषण झाले तरी तो बंद केला जाईल, असे कदम म्हणाले.
अद्याप सुरू न झालेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने विरोध केला आहे. त्याच धर्तीवर एव्हीएच प्रकल्पही रद्द करा, दुटप्पी भूमिका घेऊ नका. आमच्या कार्यकाळात जनरेट्यामुळे पुणे जिल्ह्यातील डाऊ प्रकल्प गुंडाळण्यात आला होता, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विषाची परीक्षा कशाला पाहता, प्रकल्प बंद करा, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले. यावर, ‘आम्ही म्हणू तेच उत्तर द्या, असे चालणार नाही. सरकार दबावापुढे झुकणार नाही,’ असे कदम म्हणाले.
शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांच्यासह १० आमदारांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रकल्प रद्द करावा, प्रकल्पाबाबत जनसुनावणी घ्यावी, या मागण्या सदस्यांनी लावून धरल्या. ‘प्रकल्पाला तुमच्याच सरकारने परवानगी दिली, मग आता विरोध कशाच्या आधारे करता,’ असा सवाल रामदास कदम यांनी केला.
प्रकल्प बंद करण्याची वा प्रकल्पावर जनसुनावणीची शिफारस केंद्राकडे करण्याची मागणी कदम मान्य करीत नाहीत हे दिसताच सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्य जागा सोडून समोर आले आणि मागणी रेटू लागले. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन पुनर्तपासणीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)

सर्वपक्षीय आमदार
सभागृहात एकवटले
हा प्रकल्प कायमचा बंद करण्याच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय आमदार एकवटले. माजी मंत्री हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, जितेंद्र आव्हाड, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, शिवसेनेचे चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, भाजपाचे सुरेश हळवणकर यांनी पर्यावरणमंत्र्यांची कोंडी करीत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

कुपेकर यांनी मंत्र्यांना सुनावले
एरवी सभागृहात अत्यंत कमी बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी मंत्री रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. ‘प्रकल्पाची पाहणी करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी सहा तास डांबून ठेवले.
अजून प्रकल्प सुरूच झाला नाही, तर साप साप म्हणून भुई धोपटणे सुरू झाले आहे,’ असे कदम म्हणाले. त्यावर कुपेकर म्हणाल्या, ‘नागरिकांनी कोणालाही डांबलेले नव्हते. जनतेच्या जिवावर बेतते तेव्हा उद्रेक होतो. त्या उद्रेकाची दखल घ्या आणि हा प्रकल्प बंद करा.’

Web Title: Crushing for removal of AVH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.