क्रुझ पर्यटनामुळे मुंबई व देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल-भाटिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:56 AM2018-12-08T05:56:01+5:302018-12-08T05:56:08+5:30
क्रुझ पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
मुंबई : क्रुझ पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. जल पर्यटनाला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचा कायापालट करण्यात येत असून वर्षभरात सर्व सुविधांनी युक्त विमानतळाप्रमाणे क्रुझ टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. जल पर्यटनाच्या माध्यमातून मुंबईसह देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला.
जगप्रसिद्ध कोस्टा कंपनीचे कोस्टा निओ रिवेरा क्रुझ नुकतेच मुंबईत दाखल झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात भाटिया बोलत होते. कोस्टा क्रुझ कंपनीने मुंबईवर विश्वास दाखवला असून मुंबईकर मोठ्या संख्येने क्रुझ पर्यटनाचा आनंद घेतील व त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील, असे भाटिया म्हणाले.
इटलीहून आलेली कोस्टा क्रुझ मुंबई बंदरात होम पोर्टिंगसाठी दाखल झाली असून पुढील तीन महिने ती मुंबई ते कोची (४ रात्र), कोची ते मालदिव (३ रात्र) व मालदिव ते मुंबई (७ रात्र) अशा तीन वेगवेगळ्या प्रवासासाठी रवाना होईल. शुक्रवारच्या स्वागत समारंभाला सीमाशुल्क विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त राजीव टंडन, इटलीच्या मुंबईतील राजदूत स्टेफनिया कॉस्टांन्झा, परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, कोस्टाचे उपाध्यक्ष मॅसिमो ब्रॅन्कॅलिनी, भारतातील प्रतिनिधी नलिनी गुप्ता, मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
भारत व इटलीमधील पर्यटनाला नवीन आयाम प्राप्त होईल, असा विश्वास नलिनी गुप्ता यांनी व्यक्त केला. सीमाशुल्क विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त राजीव टंडन यांनी जल पर्यटनामध्ये येणारे अडथळे दूर करण्यात येतील व सर्व आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ८ डिसेंबर २०१८ ते १६ मार्च २०१९ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल.
>१४ मजली भव्य क्रुझ, ६५४ केबिन, ७०० क्रू मेंबर, १७०० प्रवासी क्षमता, १४ व्या मजल्यावर बास्केटबॉल मैदान, डिस्को, थिएटर, कसिनो, बॉलरूम, ग्रँड बार, जलतरण तलाव, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक आदी विविध सुविधा या क्रुझमध्ये उपलब्ध आहेत.