क्रिस्टल मॉल, लक्ष्मी प्लाझाने भरले दोन कोटी; थकीत मालमत्ता कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:45 AM2020-03-12T00:45:20+5:302020-03-12T00:45:32+5:30
वांद्रे पश्चिमच्या लिकिंग रोडवर असलेल्या क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील गाळेधारकांनी चार कोटी आठ लाख रुपये मालमत्ता कर थकविला होता.
मुंबई : मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठी आस्थापने, मॉल्सवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत पालिकेचे कर्मचारी थेट महागड्या वस्तूच जप्त करीत असल्याने अखेर थकीत कर तत्काळ भरण्यास थकबाकीदारांनी सुरुवात केली आहे. वांद्रेमधील क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉल आणि अंधेरी पश्चिमच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इंस्टेटमधील मालमत्ता कर थकवणाºया गाळेधारकांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. लोकलज्जेस्तव कारवाई टाळण्यासाठी या थकबाकीदारांनी सुमारे दोन कोटी रुपये थकीत रक्कम जमा केली आहे.
वांद्रे पश्चिमच्या लिकिंग रोडवर असलेल्या क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील गाळेधारकांनी चार कोटी आठ लाख रुपये मालमत्ता कर थकविला होता. लक्ष्मी प्लाझा या गाळेधारकाकडे २५ लाखांची थकबाकी होती. महापालिकेने त्यांची चल संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करताच क्रिस्टल मॉलमधील १६७ गाळेधारकांनी एक कोटी ७८ लाखांचे धनादेश पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. तर लक्ष्मी प्लाझाच्या मालकानेही २५ लाखांपैकी साडेबारा लाखांचा धनादेश लगेच देऊन आपली सुटका करून घेतली. उर्वरित रक्कमही लवकरच भरण्याची हमी त्यांनी दिली़
क्रिस्टल पॅराडाईज शॉपर्स मॉलमधील १६७ गाळेधारकांनी सुमारे एक कोटी ७८ लाखांचा धनादेश पालिकेच्या स्वाधीन केला. तर अंधेरीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयल इंस्टेटमधील लक्ष्मी प्लाझा या गाळेधारकाने साडेबारा लाख रुपये भरले आहेत.
मालमत्ताधारक - चार लाख ५० हजार
निवासी - एक लाख २७ हजार
व्यावसायिक - ६७ हजारांपेक्षा अधिक
औद्योगिक सहा हजार,
भूभाग आणि इतर - १२ हजार १५६
वर्ष २०१९-२०चे मालमत्ता कराचे लक्ष्य पाच हजार ४०० कोटी