Join us  

‘बादशहा’च्या मानगुटीवर बसले सीआरझेडचे भूत!

By admin | Published: March 20, 2015 1:40 AM

अलिबाग व मुरुड तालुक्यातील सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून धनिकांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत.

अलिबाग : अलिबाग व मुरुड तालुक्यातील सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून धनिकांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. अलिबाग येथील थळ परिसरात अशाच एका समुद्रकिनारच्या अनधिकृत बांधकामावर महसूल यंत्रणेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. हा बंगला हिंदी सिनेसृष्टीतील एका बादशहा सिनेस्टारचा असल्याची चर्चा थळ परिसरात होत आहे.महसूल यंत्रणेकडे आलेल्या एका तक्रारीच्या आधारे आज सदर बांधकामाचा थळच्या तलाठ्यांनी पंचनामा केला. इमारतीचे बांधकाम अनधिकृत असून, संबंधित मालकावर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे असल्याचे मत थळच्या तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यात व्यक्त केले आहे. थळ येथील सर्व्हे नंबर १८८/ब, १८८/२, १८८/३ आणि १८८/४ ही मिळकत मे. देजावू फार्म प्रा. लि. कंपनीतर्फे संचालक मोरेश्वर आजगावकर यांची आहे. त्यांनी तेथे बांधकाम केल्याबाबतची तक्रार थळ विभागीय अध्यक्ष नंदकुमार घरत यांनी १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केली होती. त्या तक्रारीची दखल घेत तलाठी पालवे यांनी आज पोलीस संरक्षणात पंचनामा केला. आजगावकर यांनी ३२ मीटर लांबी, १५ मीटर रुंदी, १२ मीटर उंची; त्याचप्रमाणे १३ मीटर लांबी, ५ मीटर रुंदी, १२ मीटर उंचीचे बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे ४८ मीटर लांबी, ११ मीटर आणि ६ फूट उंचीच्या तरण तलावाचेही बांधकाम केले आहे. मिळकतीच्या दक्षिण बाजूला १८० मीटर लांब, २ फूट रुंद आणि ५ फूट उंचीची संरक्षक भिंत उभारली असून, ती सरकारी जागेत असण्याची शक्यता असल्याचे पंचनाम्यात नमूूद केले आहे.च्अनधिकृत बांधकाम करून पर्यावरणाला हानी पोहोचविल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी संजय भगत यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे बांधकाम १० डिसेंबर २०१०पर्यंत तोडण्याचे आदेश तत्कालीन तहसीलदार शारदा पोवार यांनी २ डिसेंबर २०१० रोजी आजगावकर यांना दिले होते.च्१९ मार्च २०१५ रोजी हे बांधकाम अबाधित असून, त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा बांधकामांना बड्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याची चर्चा परिसरात होती. या बांधकामाविरोधात ग्रामस्थ दत्तात्रेय ठाकूर आणि पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेले जगदीश घरत यांनी लढा उभारला होता. सामान्यांनी तात्पुरती शेड उभारली तर ती तातडीने तोडण्यात येते. या इमारतीचे बांधकाम समुद्रालगत सुरूच असून, बांधकाम पाडण्यात यावे, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आहे.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. थळ येथील अनधिकृत बांधकामाबाबत अलिबागचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे कारवाई करण्यास सक्षम अधिकारी आहेत. ते यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. - सुमंत भांगे, जिल्हाधिकारी रायगड