Join us

विरार - अलिबाग काँरीडोरच्या मार्गात सीआरझेडचा अडथळा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:10 PM

चिरनेर ते बाळावली पट्ट्यातील मार्ग बदलण्याची सूचना

मुंबई : आँगस्ट २०२० पासून विरारअलिबाग मल्टिमोडल काँरीडोरचे (बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका) काम सुरू करण्याचे प्रयत्न सपशेल फसले असून हा महत्वाकांक्षी प्रकल्प आजही पर्यावरण सीआरझेड, वन आणि वन्यजीव विभागांच्या परवानग्यांमध्येच अडकून पडला आहे. या मार्गामुळे चिरनेर ते बाळावली या १८ किमी लांबीच्या पट्ट्यातील खारफूटी आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र कोस्टल झोन मँनेजमेंट अथाँरीटीने (एमसीझेडएमए) नुकत्याच झालेल्या बैठकीत नोंदविला आहे. तो -ह्रास टाळण्यासाठी या भागातील मार्ग बदलण्याची सूचनाही केली आहे.    

विरारअलिबाग या राज्यातील महत्वाकांक्षी काँरिडोरसाठी  आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या जुलै, २०२० पर्यंत मिळतील. त्यानंतर आँगस्ट, २०२० मध्ये काम सुरू करून पुढील पाच वर्षांत म्हणजे आँगस्ट, २०२५ पर्यंत ही मार्गिका सुरू होईल असे सांगण्यात आले होते. परंतु, या मार्गिकेसाठी आजतागायत राज्यातील सीआरझेड आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्यासुध्दा आजतागायत मिळू शकलेल्या नाहीत. एमसीझेएमच्या अखत्यारीतील परवानग्यांसाठी १७ आँक्टोबर, २०१६ पासून पाठपुरावा सुरू आहे. तब्बल चार वर्षानंतर या प्रस्तावित मार्गिकेमुळे चिरनेर परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष या विभागाने काढला आहे.  

विरार ते अलिबाग ही १२८ किमी लांबीची मार्गिका असून त्यापैकी १८ किमी मार्ग चिरनेर ते बाळावली या भागातून जातो. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि एस्क्स्प्रेस वे हे प्रमुख रस्ते तिथे जोडले जाणार आहेत. १८ किमीच्या या रस्त्यावर सहा फ्लाय ओव्हर, दोन ओव्हर पास, पाच मोठे आणि तीन छोटे पूल, सात बाँक्स कल्व्हर्ट आणि ८०० मीटर्सचा एक बोगदा आहे. रस्त्यासाठी संपादित कराव्या लागणा-या २२० हेक्टर जागेवर सीआरझेड, वन आणि खारफूटीचे जंगल आहे. सीआरझेपासून ५० मीटर्स अंतरावर कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही. मात्र, या मार्गामुळे अशी १९.९५ हेक्टर जागा बाधित होत आहे. तसेच, कर्नाळा अभयारण्य या मार्गापासून २.३ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या मार्गाचे दुष्परिणाम पर्यावरणावर होईल असे मत एमसीझेडएमएने संबंधित विभागांचे अहवाल, प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण आणि एमएमआरडीएची बाजू ऐकल्यानंतर नोंदविले आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता न देता पर्यायी मार्ग शोधण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक मंजू-यांची प्रक्रियेसह प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आणखी लांबणीवर पडणार आहे.

------------------------

मार्गिकेची जबाबदारी एमएसआरडीसीकडे

राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. त्यामुळे विरार अलिबाग मार्गिकेचे कामही एमएमआरडीएकडून आता एमएसआरडीसीकडे सोपविण्याचा निर्णय एमएमआरडीएच्या ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.  त्यामुळे हा मार्ग आता आमच्या अखत्यारीत नाही असे सांगत एमसीझेडएमएच्या निर्णयानंतरच्या भूमिकेवर एमएमआरडीएकडून भाष्य केले जात नाही. तर, अद्याप हा मार्ग हस्तांतरीत झाला नसल्याचे सांगत एमएसआरडीसीच्या अधिका-यांकडूनही प्रतिक्रीया दिली गेली नाही.

 

टॅग्स :रस्ते वाहतूकविरारअलिबागराज्य रस्ते विकास महामंडळ