मुंबई : सीएसची जुलै महिन्यात होणारी परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली असून देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ६ जुलै ते १६ जुलै २०२० दरम्यान होणारी ही परीक्षा आता १८ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान घेतली जाणार आहे. यासंबंधित माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सीएस फाउंडेशन ची १ जून ते १० जून दरम्यान होणारी ही परीक्षा या आधी कोरोनामुळेच लांबणीवर टाकत जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. मात्र कोरोनाची देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ही परीक्षा आणखी काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आता ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.