मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीच्या मागील बाजूस भंगार पडले आहे. जुन्या खुर्च्या, कपाटे, बाकडे, कौले, विटा पडल्या आहेत. तर, बेस्ट बसच्या थांब्याकडील भागात मद्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पुढून चकाचक दिसणारे सीएसएमटी स्थानक मागून भकास दिसत आहे.सीएसएमटीची हेरिटेज इमारत आणि परिसर पाहण्यासाठी देशासह परदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र या पर्यटकांना हेरिटेज इमारतीचे भकास दृश्य दिसून येत असतात. काही पर्यटक सीएसएमटी हेरिटेज परिसरातील अस्वच्छतेचे फोटो काढतात.सीएसएमटी हेरिटेज इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. यात कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र यामध्ये सीएसएमटीच्या मागील बाजूस कोणताही खर्च न केल्याचे दिसून येत आहे. मागील बाजूकडील देखाव्याची काच फुटलेली आहे. बेस्ट बसच्या थांब्याकडील भागात दगड, रेती पडून असल्याचे दिसून आले. मागील बाजूकडील कॅन्टीनच्या परिसरात उग्र वास येतो. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होतोय.नुकताच सीएसएमटीला ‘स्वच्छ स्थानक’ म्हणून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी ५० हजार रुपयांचा पुरस्कार घोषित केला आहे. यासह जलशक्ती मंत्रालय, पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला देशातील सर्वाधिक स्वच्छ ठिकाण म्हणून घोषित केले आहे. मात्र सीएसएमटीची पुढील बाजू चकाचक दिसून येत असली, तरी मागून भकास दिसत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
सीएसएमटी पुढून चकाचक, मागून भकास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:45 AM