मुंबई : सह्याद्र्रीच्या कुशीत असणाऱ्या गडकिल्ल्यांनी नेहमीच प्रेरणा देण्याचे काम केले आहे. अशीच प्रेरणा देणारा इतिहास मुंबईकरांना लवकरच अनुभवण्यास मिळणार आहे. सीएसटी परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक १८जवळील परिसराचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी परिसरात सात किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सकडून यावर काम केले जात असून, त्याचे सादरीकरण मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांमोर नुकतेच करण्यात आले. सीएसटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८बाहेरील परिसर हा सध्या ओसाड आहे. खूप मोठा परिसर असलेल्या या भागात मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना सोडण्यासाठी फक्त खासगी वाहने आणि टॅक्सी येतात. हे पाहता या परिसराचा योग्य वापर करण्यासाठी त्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सला यावर आराखडा बनविण्यास सांगण्यात आले होते. आराखड्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक १८ला समांतर अशा रेल्वेच्या सात इमारती उभारल्या जाणार आहेत. या इमारतींचा दर्शनी भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, राजगड, जंजिरा या किल्ल्यांशी संबंधित असणार आहे. यामध्ये शिवनेरी नावाच्या इमारतीत तब्बल ३ हजार लोकांची क्षमता असलेले प्रदर्शन दालन उभारले जाईल, अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. अन्य सहा इमारती या रेल्वेच्या वापरासाठी असतील. (प्रतिनिधी)या सात इमारतींच्या तटबंदी भागावर प्रकाश आणि ध्वनी यांच्या माध्यमातून स्लाईड शो केला जाईल. इमारतींची उंची २७ मीटरपेक्षा कमी असेल. डॉकयार्ड रोडपासून हार्बर मार्ग सीएसटीकडे एलिव्हेटेड केला जाणार आहे. या मार्गाच्या छतावरून स्लाईड शो पाहता येणे शक्य असेल. येत्या रेल्वे अर्थसंकल्पात त्याची घोषणा होण्याची शक्यता.
सीएसटी परिसरात अवतरणार ‘किल्ले’
By admin | Published: February 19, 2016 2:44 AM