Join us

सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर

By admin | Published: July 02, 2015 3:51 AM

हार्बरवरील बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. या प्रकल्पासाठी

मुंबई : हार्बरवरील बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ११ हजार कोटी रुपये खर्च येणार असून, या निधीची जुळवाजुळव करण्यासाठी विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या सीएसटी ते पनवेल प्रवासास ७७ मिनिटे लागतात. फास्ट कॉरिडोर झाल्यास ४५ मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात एकूण १० स्थानकांचा समावेश आहे.चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड आणि सीएसटी ते कल्याण एलिव्हेटेड प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनातील सुसंवादामुळे रखडले आहे. त्यामुळे या यादीतील तिसऱ्या म्हणजेच सीएसटी ते पनवेल या हार्बर मार्गावरील फास्ट कॉरिडोर प्रकल्प पूर्ण करण्यावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) भर देण्यात येत आहे. चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. राज्य सरकारशी होणारा सहकार्य करार मात्र झालेला नाही. सीएसटी ते कल्याण एलिव्हेटेड प्रकल्पही पुढे सरकरण्यातही अडचणी येत आहेत. हे पाहता प्रथम सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्पच मार्गी लावण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पाचा सर्व्हेही पूर्ण झालेला आहे. याबाबत एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले की, हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरु आहेत. प्रकल्पाचा खर्चासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.