Join us

सीएसटी-पनवेल प्रकल्प लागला मार्गी

By admin | Published: November 10, 2015 2:29 AM

हार्बर मार्गावरील प्रवास अधिक जलद करणारा सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवास अधिक जलद करणारा सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे निधी उभारणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. सोमवारी बोरीवली स्थानकात पादचारीपूल, सरकत्या जिन्याचे उद्घाटन करतानाच प्रस्तावित डेकचे भूमिपूजन प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर असा एमआरव्हीसीचा (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) प्रकल्प आहे. या प्रकल्पाला गती देण्यात येत असून, एमआरव्हीसी आणि सिडकोकडून त्यावर काम केले जात आहे. यापूर्वी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवरील मेगा प्रकल्पांपैकी असलेले चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड आणि त्याचबरोबर सीएसटी ते कल्याण एलिव्हेटेड प्रकल्प अनेक कारणास्तव रखडले आहेत. आता सीएसटी ते पनवेल हा हार्बर मार्गावरील फास्ट कॉरिडोर प्रकल्प पूर्ण करण्यावर एमआरव्हीसीकडून भर दिला जात आहे. बोरीवली येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी याविषयी बोलताना प्रभू म्हणाले, की मुंबईतील रेल्वेचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारबरोबर रेल्वे प्रशासन संयुक्तपणे कंपनी स्थापन करणार आहे. त्याचप्रमाणे उपनगरीय मार्गासाठी असलेला एमयूटीपी-३ प्रकल्पामध्ये १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव असून, तो नीती आयोगासमोर मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लोकल तसेच मेल-एक्सप्रेस डब्यातील अंतर्गत सजावट बदलण्यावर भर दिला जात असल्याची माहितीही प्रभू यांनी यावेळी दिली. बोरीवली स्थानकात सहा नंबर प्लॅटफॉर्मवर असणारा सरकता जिना प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी उपलब्ध असेल.निविदा मंजुरीचे अधिकार आता स्टेशनमास्तरांनाहीनिविदा मंजुरीचे अधिकार हे आता महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांपासून अगदी स्टेशनमास्तरांनाही देण्यात येणार आहेत. यामुळे एक रुपयाच्या निविदा मंजुरीचे अधिकार माझ्याकडे राहणार नसल्याचे प्रभू यांनी आपल्या भाषणातून सांगितले. याआधीच्या सरकारमध्ये निविदा काढायला सहा वर्षे लागायची. आता सहा महिन्यांत निविदा पास होत असल्याचे ते म्हणाले.