सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी डॉक्टरांचे रॅकेट हाणून पाडणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 05:47 PM2020-10-18T17:47:16+5:302020-10-18T17:47:42+5:30
Health News : माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची परखड भूमिका
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईतील पालिकेच्या 24 वॉर्ड पैकी आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आर मध्य वॉर्ड मध्ये असून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्धल केली जात आहे. सदर वॉर्डमध्ये उच्चभ्रू,मध्यमवर्गीय व झोपडपट्टी असा संमीश्र वस्ती असा भाग असून येथे गुजराथी भाषिकांची संख्या जास्त आहे.
दि,9 ते दि,15 ऑक्टोबरच्या आकडेवारी नुसार आर मध्य वॉर्ड मध्ये या कालावधीत 1199 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले.आतापर्यंत येथे 15910 कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 13058 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले, तर 471 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तर 2431 सक्रीय रुग्ण आहेत,या वॉर्ड मध्ये रुग्ण वाढीचा दुपटीचा दर हा 62 दिवस आहे.
आर वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार, येथील सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे आणि त्यांचे कार्यकारी वैद्यकीय अधिकारी,इतर अधिकारी व कर्मचारी गेली 7 महिने अविरत मेहनत करत आहे.मात्र रोज येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आर मध्य विभागाला नुकतीच भेट देऊन तेथील कोरोना परिस्थितीच्या संदर्भात आढावा बैठक घेतली व रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात करीता या वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांना विविध सूचना केल्या.यावेळी शिवसेना आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस,महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी,सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी कावळे उपस्थित होते.
येथील वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा बरोबर आहे का? असा सवाल राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत केला आहे. एकाच पॅथालॉजी लॅब मधून केसेस पॉझिटिव्ह येत असल्याने क्रॉस व्हेरिफिकेशनची आवश्यकता आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.एकूण लोकसंख्येच्या मानाने अँटीजेन टेस्टचे प्रमाण कमी आहे असे त्यांनी सांगितले.
येथील काही खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून वेगवेगळी पॅकेजेस आकरली जाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच येथील सीटी स्कॅन,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आणि डॉक्टरांचे रॅकेट हाणून पाडणे गरजेचे आहे. सीटी स्कॅनचे दर राज्य शासनाने ठरवून दिले आहेत,तसे आकारणे क्रमप्राप्त आहे तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सील यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे असे ठाम मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
रॅमिडेसीवर किंवा टॉसीलिझुमॅब उपलब्ध आहेत अशी जाहिरात येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत अशी जाहिरातबाजी करणे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला.आणि राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरात ही औषधे इंजक्शने रुग्णांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे डॉ.दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
आमदार विलास पोतनीस म्हणाले की,येथील कोरोना रुग्णवाढीला येथे वाढलेले अनधिकृत फेरीवाले कारणीभूत असून पालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिले.तसेच घरात जर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर रुग्ण हे घरातच क्वारंटाईन होणे पसंत करतात.मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य बाहेर फिरतात आणि क्वारंटाईनचे नियम पाळत नाही.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे अशा नागरिकांवर देखिल करवाई केली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.