खुल्या व्यायामशाळेसमोर कोंबडीवडे
By Admin | Published: July 22, 2015 02:17 AM2015-07-22T02:17:12+5:302015-07-22T02:17:12+5:30
तात्पुरती परवानगी देऊन मरिन ड्राइव्हवरील खुल्या व्यायामशाळेला पालिका प्रशासनाने अभय दिल्यामुळे
मुंबई : तात्पुरती परवानगी देऊन मरिन ड्राइव्हवरील खुल्या व्यायामशाळेला पालिका प्रशासनाने अभय दिल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत़ त्यानुसार या व्यायामशाळेसमोरच कोंबडीवडे व वडापावचे स्टॉल्स स्वाभिमान संघटनेने सोमवारी रात्री लावून शिवसेनेला दणका दिला़ मात्र यामुळे उभय पक्षांमध्ये हाणामारीचा प्रसंग ओढावू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना अटक केली़
प्रसिद्ध अभिनेता दिनो मोरियामार्फत प्रायोजित खुल्या व्यायामशाळेवरून वाद पेटला आहे़ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या या व्यायामशाळेला सी विभागाची परवानगीच नसल्याचे उजेडात आले़ यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असताना व्यायामशाळेला तीन महिन्यांची तात्पुरती परवानगी असल्याचे जाहीर करीत प्रशासनाने शिवसेनेची लाज वाचविली़ मात्र व्यायामशाळेविरोधातील आंदोलनातून माघार न घेता काँग्रेसने या ठिकाणी कांदेपोह्यांचे स्टॉल्स टाकण्याचा इशारा दिला आहे़
तर ‘या व्यायामशाळेत कसरत करून भुकेल्यांसाठी गरमागरम वडापावचे स्टॉल्स टाकणार, आता मस्त झोंबेल आमच्या मित्रांना’, असे टिष्ट्वट करून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिले़ काही वेळातच स्वाभिमान संघटनेच्या कोंबडीवडे व वडापावच्या गाड्या व्यायामशाळेसमोर लावण्यात आल्या़ मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करीत स्टॉल्स जप्त करून कार्यकर्त्यांना अटक केली़ तणाव निवळल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले़ (प्रतिनिधी)