मुंबई : नेव्हीतील कमांडरच्या बॅँक खात्यावरून परस्पर रक्कम काढल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची उपरती अखेर कफ परेड पोलिसांना झाली आहे. फिर्यादीला बोलावून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रार अर्जानुसार गुरुवारी रीतसर गुन्हा दाखल केला. ‘लोकमत’ने या प्रकरणी बुधवारी वृत्त दिले होते. त्याच दिवशी कमांडर संजय सोलवट यांना बोलावून त्यांचा जबाब घेण्यात आल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त अभिनव त्रिमुखे यांनी सांगितले.
नौदलाच्या पश्चिम विभागामधील कमांडर संजय सोलवट यांच्या आयसीआयसीआय बॅँकेच्या खात्यातून २ मे रोजी सायंकाळी पाच मिनिटांच्या अंतरात लागोपाठ पाच ‘ट्रान्झक्शन’ होऊन ९० हजार रुपये काढण्यात आले. त्याबाबत त्यांनी ३ मे रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तेव्हापासून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर उपायुक्त त्रिमुखे यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी व संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले. त्यांच्या सूचनेनुसार बुधवारी कमांडर सोलवट यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. अहमदाबाद येथील एका एटीएममधून पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने अहमदाबाद क्राइम ब्रँचशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.बॅँकेवर कायदेशीर कारवाई करूआयसीआयसीआय बॅँकेकडे वारंवार मागणी करूनही संबंधित एटीएम सेंटरचे फुटेज अद्याप दिलेले नाही. त्यांनी आणखी चालढकल केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहोत.- संजय सोलवट, तक्रारदार व कमांडर, नेव्ही, पश्चिम विभाग