Join us

कफ परेड ते मरिन ड्राइव्ह उन्नत मार्गाने जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 3:21 AM

पालिकेचा प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : कफ परेड ते मरिन ड्राइव्ह उन्नत मार्गाने जोडण्याचे चार दशकांपासूनचे महापालिकेचे स्वप्न अखेर नववर्षात साकार होणार आहे़ या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून या जोडरस्त्याचा अहवाल आणि डिझाइन तयार करण्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतला.जागतिक दर्जाच्या मुंबई शहराला वेगवान करणाऱ्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीत आढावा घेतला़ सध्या मरिन ड्राइव्हहून नेव्ही नगरला जाण्यासाठी वाहन चालकांना बधवर पार्कमार्गे वळसा घालावा लागतो़ वर्दळीच्या वेळेत येथून जाण्यास वाहनचालकांना १० ते १५ मिनिटांऐवजी ३० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव १९७० मध्ये चर्चेत आला होता़ परंतु स्थानिक मच्छीमारांच्या विरोधामुळे त्यावर गेल्या चार दशकांत कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आॅगस्ट २०१९ मध्ये या प्रकल्पाचा फेरआढावा घेतला होता़ त्यानंतर प्रकल्पावर पालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा जोमाने काम सुरू केले होते़ कुलाबा येथील मच्छीमारांच्या तक्रारी लक्षात घेऊन यामध्ये आता बदल केला आहे़ त्यानुसार समुद्रात भराव न टाकता उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव अधिकाºयांनी तयार केला आहे़ उन्नत मार्गाचा आराखडा, पर्यावरणाशी संबंधित ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी ही नियुक्त सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे.जोडरस्त्याखाली जागा सोडण्याचे निश्चितउन्नत मार्गाचा परिणाम मच्छीमारांच्या व्यवसायावर होणार नाही़ तसेच त्यांना सहज समुद्रात जाता यावे, यासाठी या जोडरस्त्याखाली जागा सोडण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते़ त्याचबरोबर मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी माहीम ते सायन जोड रस्ता आणि सांताक्रुझ पूर्व येथील हंस भुग्रा मार्गाचाही या बैठकीत विचार करण्यात आला.पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी माझगाव येथील हँकॉक पूल आणि घाटकोपर मानखुर्द जोड रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़ परंतु, मशीद बंदर येथील महत्त्वाचा कर्नाक बंदर पूल सुरू होण्यास आणखी काही अवधी लागणार आहे. रस्त्यांची रखडलेली कामे आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामाचा आढावा घेऊन २०२० मधील पावसात पाणी तुंबणार नाही, याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला़