शेतीच्या नावाखाली गांजाची लागवड कराल, तर कोठडीत जाल; मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:11 AM2024-01-18T10:11:58+5:302024-01-18T10:12:56+5:30
गेल्या अकरा महिन्यांत ड्रग्ज तस्करी प्रकरणी १,३१३ गुन्हे दाखल.
मुंबई : गेल्या ११ महिन्यांत मुंबई पोलिसांनी ६२९ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत ७७५ गुन्हे नोंदवत ८३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विविध शेतीच्या नावाखाली तुम्हीही गांजा शेती केली तर कोठडीची हवा खावी लागणार आहे.
मुंबई पोलिसांकडून गेल्या ११ महिन्यांत ड्रग्ज तस्करी प्रकरणी १,३१३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईत १,६१६ जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध ९००९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये ९,१३८ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा प्रकरणी ७७५ सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.यापूर्वी एनसीबीने केलेल्या कारवाईत घरातच जमीनविरहित हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या दुकलीला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या.
घरातच केली शेती :
यापूर्वी एनसीबीने केलेल्या कारवाईत घरातच जमीनविरहित हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या दुकलीला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या. डोंबिवलीच्या पलावा सिटीतील रहिवासी इमारतीतील २ बीएचके फ्लॅटमध्ये शेती सुरू होती. यासाठी डार्कवेबद्वारे ॲमस्टरडॅम, नेदरलॅण्ड येथून बियाणे विकत घेण्यात येत होते. अटक करण्यात आलेल्या दुकलीकडून १ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे.
कुठे बिटकॉइन्स तर कुठे स्नॅपचॅट :
याची खरेदी-विक्री बिटकॉइन्सद्वारे करण्यात येत होती. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्नॅपचॅट आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया ॲप्सचा आधार घेण्यात आला होता.
बाजारात गांजाला भाव काय?
बाजारात ५० ते १०० रुपयांमध्ये गांजाचे पॅकेट मुलांना मिळत आहे. झोपडपट्टीसह हायप्रोफाइल सोसायटीसह शाळा, कॉलेज परिसराभोवती तस्कर मंडळी घिरट्या घालताना अनेकदा पोलिसांच्या कारवाईत अडकले आहेत.