सांस्कृतिक विविधता, सर्वसमावेशकता, प्रेमळ माणसे मुंबईचे वैभव - कोबी शोशानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:10 AM2021-08-22T06:10:40+5:302021-08-22T06:10:51+5:30

कोबी शोशानी; भारत - इस्रायलमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील

Cultural diversity, inclusiveness, loving people, the glory of Mumbai | सांस्कृतिक विविधता, सर्वसमावेशकता, प्रेमळ माणसे मुंबईचे वैभव - कोबी शोशानी

सांस्कृतिक विविधता, सर्वसमावेशकता, प्रेमळ माणसे मुंबईचे वैभव - कोबी शोशानी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई हे जगातील असे शहर आहे, जे माणसाला प्रेमात पाडते. इथली प्रत्येक गोष्ट मनाला भुरळ पाडणारी आहे. सागरी संपन्नता, सांस्कृतिक विविधता, सर्वसमावेशक वृत्ती आणि प्रेमळ माणसे मुंबईच्या वैभवात भर घालतात. त्यामुळेच मला जेव्हा वाणिज्यदूत म्हणून क्षेत्रनिवड करण्यास सांगण्यात आले तेव्हा मी मुंबईची निवड केली, असे इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत (कौन्सूल जनरल) कोबी शोशानी यांनी सांगितले.

शोशानी यांनी अलीकडेच ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे समन्वयक संपादक दिनकर रायकर आणि जाहिरात विभागाचे अध्यक्ष करुण गेरा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. इस्रायल आणि भारतातील संबंधांसह विविध विषयांवर शोशानी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, १९९२ साली मी भारतात पहिल्यांदा आलो तेव्हा ई-मेल पाठविण्याइतकेही तंत्रज्ञान येथे विकसित झाले नव्हते; पण आज कुशल तंत्रज्ञ घडवणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. अल्पावधीत घेतलेली ही झेप वाखाणण्याजोगी आहे. मुंबईसारख्या शहरात तर आश्चर्यकारक बदल झाले आहेत. मी यापूर्वी बऱ्याचदा येथे येऊन गेलो; पण नव्वदच्या दशकातील मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. इथल्या टोलेजंग इमारती, दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी, बदललेले राहणीमान, सामाजिक-राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल थक्क करणारे आहेत. पायाभूत सुविधांनी मुंबईच्या विकासाची व्याख्याच बदलून टाकली आहे, असेही ते कौतुकाने म्हणाले.

युवकांमुळे भारताचे भविष्य उज्ज्वल
भारतातील युवावर्ग प्रचंड बुद्धिमान आहे. त्यांच्यात असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आहे. सर्वाधिक युवा लोकसंख्येचा देश असल्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार शोशानी यांनी काढले.

भारताचे जगाला कौतुक
भारताने ज्या पद्धतीने कोरोनाची हाताळणी केली, त्याचे साऱ्या जगाला कौतुक आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या या देशात कोरोना प्रसाराचा धोका सर्वाधिक होता; पण जितक्या वेगाने संसर्गप्रसार झाला तितक्याच वेगाने तो आटोक्यात आणण्यात भारताला यश आले. भारताने लसीकरणात घेतलेली आघाडीही नोंद घेण्याजोगी आहे. १.४ दशलक्ष लोकांना दोनवेळा लस टोचण्याचे आव्हान भारतासमोर आहे, असेही शोशानी म्हणाले.

अमिताभ, विद्या बालनचे ‘फॅन’
भारताला संपन्न अशी सिनेपरंपरा लाभली आहे. वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी करण्याचे कसब इथल्या कलाकारांमध्ये आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांचा मी फॅन आहे. अलीकडेच त्यांचा ‘टेन’ हा चित्रपट पाहिल्याची आठवणही शोशानी यांनी सांगितली. भारत - इस्रायल सहकार्याने सिनेक्षेत्रात नव्या संकल्पना राबविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे भन्नाट माणूस
मुंबईत आल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटण्याचा अनेकदा योग आला. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला अतिशय उत्साही तरुण. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्याविषयी विचार करणे आणि चांगल्या गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करणे, हा त्यांच्यातील गुण स्वीकारण्यासारखा आहे, असेही शोशानी म्हणाले.

पाणीबचतीसाठी लढा उभारण्याचा व्यक्त केला मानस
n  जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नुसते जलस्रोत वाढवून भागणार नाही, तर वाया जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा लागेल. पाणी बचतीच्या बाबतीत इस्रायलने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. 
n  भारतातही अशा प्रकारची संकल्पना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांत जलसाठे वाढविण्यासाठी ‘लोकमत’ने मोठी चळवळ उभारली आहे. या चळवळीला व्यापक स्वरुप देण्यासाठी इस्रायल दुतावासाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारत आणि इस्रायलमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. दोन्ही देशांना समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आपली सांस्कृतिक संपन्नता सारखीच असल्याने राजनैतिक संबंधही सलोख्याचे राहिले आहेत. ते अधिक दृढ करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. 
- कोबी शोशानी, 
इस्रायलचे मुंबईतील 
महावाणिज्यदूत 

 भारतातील ग्रामीण जीवन मला विशेष भुरळ पाडते. इथल्या मातीप्रमाणेच नातीही ‘कलरफूल’ असल्याने एकता आणि अखंडता टिकून आहे, असेही शोशानी म्हणाले.
 

Web Title: Cultural diversity, inclusiveness, loving people, the glory of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.