हँकॉक पुलाने जपला आहे मुंबईचा सांस्कृतिक वारसा!

By admin | Published: April 17, 2016 01:44 AM2016-04-17T01:44:04+5:302016-04-17T01:44:04+5:30

१० जानेवारी २०१६ हा दिवस भारतीय रेल्वेच्या आणि पर्यायाने मध्य रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला. १८८० साली (ब्रिटिश राजवटीत) बांधला गेलेला रेल्वे मार्गावरला हँकॉक

The cultural heritage of Mumbai is confined to the Hankoq bridge. | हँकॉक पुलाने जपला आहे मुंबईचा सांस्कृतिक वारसा!

हँकॉक पुलाने जपला आहे मुंबईचा सांस्कृतिक वारसा!

Next

- सुधीर शालीनी ब्रह्मे

१० जानेवारी २०१६ हा दिवस भारतीय रेल्वेच्या आणि पर्यायाने मध्य रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला. १८८० साली (ब्रिटिश राजवटीत) बांधला गेलेला रेल्वे मार्गावरला हँकॉक हा रहदारी पूल कुठलाही अपघात टाळून पाडण्यात आला. या घटनेसाठी एरव्ही जनतेच्या संपर्कात नसलेल्या विभागानं पुरवलेल्या माहितीआधारे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचं खूप कौतुक झालं. ते गैर नाही; तशी प्रगत युगात ही कामगिरी सहज फत्ते व्हावी यात अप्रूपही नाही.

हँकॉक पूल मुंबई दक्षिणोत्तर जोडतो तसेच बंदरपट्टीला मुख्य शहराशी जोडतो. पुलावरून दक्षिणेस आलं की मुंबईचा ४०० ००९ क्रमांक डाक विभाग सुरू होतो. जे.जे. हॉस्पिटलच्या हद्दीपासून सुरू होतो तो क्रमांक ८. या दोन्ही डाक विभागांना जोडतो तो पुलावरून जाणारा शिवदास चांपसी मार्ग. रामचंद्र्र भट मार्गाने विभाजित केलेले दोन विधानसभा मतदारसंघ दक्षिणेस मुंबादेवी, उत्तरेस भायखळा हे हँकॉकने जोडलेत.

हँकॉक बांधला गेला त्याच्या २७ वर्षे आधी १८५३ मध्ये बोरीबंदर-ठाणे वाहतूक सुरू झाली होती. आज वाहतूक अनेक पटींनी वाढली असली तरी तांत्रिक प्रगतीही तेवढीच झाली आहे. डायरेक्ट करंटचं अल्टरनेट करंटमध्ये रूपांतर एवढंच कारण होतं की, पुलाच्या कार्यक्षमतेची कमाल मर्यादाही संपली होती? तसं असल्यास आजच्या प्रशासनानं आपल्या लौकिकाला जागून संबंधित विभागांना खबरदारीची सूचना दिली होती का? रेल्वेने पुरविलेल्या तांत्रिक माहितीच्या ढिगाऱ्याखाली हँकॉकचं मुंबईतील सांस्कृतिक योगदान गाडलं गेलं!
माझगाव-ताडवाडी आणि डोंगरी उमरखाडी या दोन भूप्रदेशांच्या संस्कृती याच पुलाने जोडल्या आहेत. उमरखाडी ही माजी महापौर राजाभाऊ चिंबुलकरांची कर्मभूमी. कालांतराने मुंबईच्या राजकीय पटलावर ताडवाडीच्या बाळा नांदगावकर यांचे नाव लोकप्रिय झाले.
उमरखाडीचा गणेश चौक म्हणजे उमरखाडीच्या राजाचं आसन स्थान. प्रजा समाजवादी पक्षाच्या अस्तापाठोपाठ इथला बहुसंख्य वर्ग आता अल्पत्वात येऊन चौकाभोवतीच सीमित झालाय. दक्षिणेकडच्या टोकाला चारनळ-खडक, गँगवॉरचं उगमस्थान, लालाचा अड्डा एकेकाळचा. हे लोन माझगावकडे जाऊ नये म्हणून थोपवलं हँकॉकनेच !
डोंगरीच्या भाजी-कोंबडी बाजारनजीकचा चौक चारनळ म्हणून ओळखला जातो. आजही इथे एक पाण्याची टाकी आहे. पूर्वी तिच्या चारही बाजूंना चार नळ होते. या चौकाचं नामकरण त्यामुळेच झालं. हे नळ म्हणजे पखालवाल्यांचं आश्रयस्थान. संपूर्ण विभागाची तहान भागवताना पखालवाल्यांच्या किमान दोन पिढ्यांनी इथेच आयुष्याच्या पखाली वाहिल्या.
चारनळच्या पश्चिमेस टांगेवाल्या घोड्यांचा तबेला होता. त्यापुढे गोल देवळाकडे, गिरगावकडे जाणाऱ्या मार्गावर भेंडीबाजार. अजिझ नाझासारख्या दिग्गज कव्वालांची ही कर्मभूमी. इथलं भेंडीबाजार घराणं शास्त्रीय संगीतात फारसं नावाजलेलं नसेलही, परंतु लतादीदींचं नातं या घराण्याशी जोडलं गेलंय. या घराण्याला हँकॉकनं जोडलंय ताडवाडीच्या सातमकर घराण्याशी. सातमकर हे ज्यू. सातमकरांनी पाच-सात दशकं शास्त्रीय संगीत प्रसादाचा वसा चालवलाय. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अरेंजर्सचा ताफाही सातमकर बंधूंमुळेच पूर्ण झाला.
माझगाव-उमरखाडी परिसरात ऐंशीच्या दशकापर्यंत मुंबईकर ज्यू मोठ्या संख्येने राहत होते. स्वदेश रक्षणाच्या हाकेस प्रतिसाद देत ते मायभूमीस परतले. माझगावात सर एलिक दुरी ही त्यांची नावारूपाला आलेली शाळा आहे. हा समाजही इथल्या संस्कृतीशी एकरूप होऊन राहिला.
माझगाव हे कॉन्व्हेंट हब. सेंट मेरीज ही इथली नावाजलेली शैक्षणिक संस्था, उमरखाडीत ही मक्तेदारी आहे सेंट जोसेफ या शाळेची. हँकॉकने जोसेफ आणि मेरी (ख्रिस्तोचचे पिता-माता) यांनाही जोडलंय. जोसेफ अर्थात काका बाप्टिस्टा. या भारतीय ख्रिस्ती स्वातंत्र्यसैनिकाचं उचित स्मारक माझगावच्या टेकडीवरील उद्यानाच्या रूपात उभं आहे. या उद्यानाखाली दडलाय पाण्याचा साठा, संपूर्ण दक्षिण मुंबईची तहान भागवणारा. बाप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते. लोकमान्यांना ज्या डोंगरीच्या कारागृहात डांबण्यात आलं होतं, तिथं आत बालसुधार केंद्र आहे. कारागृहातील ही खोली अनेक राज्यकर्त्यांनी दुर्लक्षित ठेवलीय.
हँकॉकमार्गे जाणाऱ्या बेस्ट बसनी माझगाव डॉक्सजवळचा दारूखाना, म्हणजेच बोटींचा भंगारखाना, थेट मंत्रालयाशी, चव्वेचाळीसच्या स्फोटातील शहिदांना फोर्टमधल्या हुतात्म्यांशी जोडलं होतं. तर भारतीय नौदलाला सागरी साम्राज्याचं सार्वभौमत्व बहाल करणाऱ्या माझगाव डॉक्सला गेट-वे वेशीवर नेऊन ठेवलं. भाऊच्या धक्क्यावर उतरलेल्यांना १३५ बस क्रांती मैदानावर नेते ती याच पुलावरून जात असे.
दीड-एक वर्षाने हँकॉक पुन्हा उभा राहील. नामकरणाचं पौरोहित्य स्वीकारणारे शहराचे पालक मग नवी पत्रिका मांडतील. वरील सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता हँकॉक हेच नाव अजरामर राहणं संयुक्तिक आहे.

Web Title: The cultural heritage of Mumbai is confined to the Hankoq bridge.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.