Join us

घरांच्या खरेदी-विक्रीतल्या काळ्या बाजाराला लगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 2:31 AM

रेडी रेकनर, बाजारभावांमधील दरी झाली कमी

मुंबई : मुंबईतल्या लोअर परेल भागात रेडी रेकनरचे दर ३२ हजार ६०९ रुपये असताना आता घरांचा प्रति चौरस फूट भाग ३४ हजार ६०० रुपयांवर आला आहे. पाच वर्षांपूर्वी या दोन्ही दरांतली तफावत ३७ टक्के होती. ती आता जेमतेम ६ टक्क्यांवर आली आहे. देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये ही दरी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे घरांच्या खरेदी-विक्रीदरम्यान रोखीने पैसे देण्याचा (काळाबाजार) व्यवहार कमी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अ‍ॅनरॉकने नुकताच देशातील प्रमुख शहरांतील रेडी रेकनरचे दर आणि बाजारभाव यांचे सर्वेक्षण केले. त्यातून या दोहोंमधील तफावत आता ६ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वच प्रमुख शहरांमध्ये रेडी रेकनरच्या दरांमध्ये पाच वर्षांत ३० टक्के वाढ झाली. मात्र, घरांची मागणी आणि पुरवठा यांच्यात निर्माण झालेल्या तफावतीमुळे बाजारभावात एका मर्यादेपेक्षा जास्त वृद्धी झालेली नाही. घरांच्या विक्रीची प्रत्यक्ष किंमत आणि करारपत्रावर नमूद किंमतीत पूर्वी तफावत असायची. फरकाच्या या रकमेची देवाणघेवाण रोखीने व्हायची. ‘ब्लॅक’चा हा व्यवहार विकासक, ग्राहकांसाठी फायदेशीर असला तरी मुद्रांक शुल्काचा महसूल बुडत होता. रेरा कायद्यानंतर अनेक विकासकांना ब्लॅकच्या व्यवहारांना मुरड घातली. मात्र, रिसेलच्या घरांच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोखीने देवाणघेवाण होते.दरांमधली तफावत आता कमी झाल्याने काळ्या बाजाराचे हे व्यवहार रोडावतील असे मत अ‍ॅनरॉक प्रॉपर्टीचे चेअरमन अनुज पुरी यांनी व्यक्त केले.दादर, ताडदेवचा भाव चढाचदादर, ताडदेव या भागात रेडी रेकनर आणि बाजारभाव यांच्यातली तफावत आजही ५८ टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी तो फरक १०० टक्के होता. आजच्या घडीला तिथले रेडी रेकनरचे दर १३ हजार ६२४ ते २३ हजार ५९७ रुपये असताना बाजारभाव मात्र ३२ हजार ६०० आणि ५६ हजार ६५९ इतका झाला आहे.जोगेश्वरी परिसरात २०१५ साली बाजारभाव १५ हजार १४३ रुपये तर रेडी रेकनर ११ हजार ५७१ रुपये होता. तो आता अनुक्रमे १७ हजार २८० आणि १६,३०० रुपये झाला आहे.

टॅग्स :बांधकाम उद्योग