वस्त्रोद्योग वीजदर सवलतीच्या योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर लगाम; मंत्री अस्लम शेख यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 12:43 PM2021-10-23T12:43:26+5:302021-10-23T12:43:35+5:30
मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येते.
मुंबई : वस्त्रोद्योग प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलत योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना लगाम बसावा म्हणून वस्त्रोद्योग आयुक्त यांच्या संकेततस्थळावर ऑनलाईन प्रस्तावासोबतच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच वीज दर सवलत वस्त्रोद्योग प्रकल्पांना लागू होईल. तसेच चुकीची अथवा खोटी माहिती सादर करुन वीज दर सवलत योजनेचा लाभ उठवत असलेल्या प्रकल्पांची वीज दर सवलत तात्काळ बंद करुन आजवर दिलेल्या अनुदानांची व्याजासह वसूली करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली. याबाबतचे नवीन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येते. कोरोनाचे संकट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे राज्याचे अर्थचक्र धीम्या गतीने चाललेले असताना देखील शासनाने वीज प्रकल्पांना अनुदान देणे चालूच ठेवले आहे. वीज दर सवलतीचा वस्त्रोद्योगाच्या नावाखाली अन्य उद्योगही लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व दक्षता व नियंत्रण पथकाच्या तपासणीत ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी नवीन शासन निर्णयात अनेक अटी नमुद करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्रोद्योग प्रकल्पांनी नव्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ठानुसार प्रस्ताव आयुक्त (वस्रोद्योग), यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर कारावेत. प्रस्तावात सादर केलेली माहिती जबाबदारी वस्रोद्योग प्रकल्पाची राहील.