मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:46+5:302021-05-26T04:06:46+5:30
मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी होत असतानाच ...
मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी होत असतानाच मुंबईचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट मंगळवारी ९३ टक्क्यांवरून ९४ टक्के झाला आहे. जवळपास २ आठवड्यांनंतर मुंबईच्या रिकव्हरी रेटमध्ये बदल झाला आहे. मुंबईत सध्या २७ हजार ६४९ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मुंबई पालिकेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईची रुग्णसंख्या आटोक्यात आली; त्याचबरोबर रिकव्हरी रेट वाढण्यातही मोठी मदत झाली. मुंबईत दिवसभरात १ हजार ४२७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुखरूपपणे घरी पाठविण्यात आले आहे.
मुंबईत १८ ते २४ मेपर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्णवाढीचा दर हा ०.१९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ५५ हजार ४२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ७०४ इतकी आहे. मुंबईत दिवसभरात २० हजार ९९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ४४ सक्रिय कंटेनमेंट झोन असून, २०६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.