मुंबई : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्क्यांवर (४७.२ टक्के) आला असून, मुंबईतील धारावीतून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मंदावली आहे, तसेच राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्क्यांवर आला आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ३ हजार ६०७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, दिवसभरात १५२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या ९७ हजार ६४८ झाली असून, बळींचा आकडा ३ हजार ५९० वर गेला आहे. सध्या राज्यात ४७ हजार ९६७ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात दिवसभरात १ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत एकूण ४६ हजार ७८ जण कोविडमुक्त झाले आहेत. मुंबईत गुरुवारी १,५४० रुग्णांची नोंद झाली. शहरातील वरळी, धारावी, वडाळा, भायखळा या विभागांत आता चित्र बदलले आहे. महापालिकेच्या ‘चेसिंग द व्हायरस’ या उपक्रमामुळे या विभागांमध्ये दररोज रुग्ण वाढण्याचा दर आता दोन टक्क्यांहून कमी आहे.केंद्र शासनाने कंटेन्मेंट झोनसाठी लागू केलेले निकष बदलावेत, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंदकाटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलीस तैनात केले जातात. मात्र, त्यांना आराम मिळावा अथवा हा पोलीस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेन्मेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.मालेगाव सावरू लागलेकोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले मालेगाव शहर आता सावरू लागले असून, परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शहरात बाधितांची संख्या ८५८ वर जाऊन पोहोचली असताना आजमितीला मालेगावमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके आहे. मालेगावी ६४ दिवसांत ६४ बळी घेणाऱ्या कोरोनाचा वाढता संसर्ग साºयाच यंत्रणेला आव्हान देणारा ठरला आणि सामूहिक प्रयत्नांतून ‘मिशन रिलीफ मालेगाव’ सुरू झाले, तर दुसरीकडे अकोला, औरंगाबाद, जळगाव आणि सोलापूर येथे कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.अधिष्ठातांसह तीन जण निलंबितजळगाव येथे कोरोनाबाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ़ सुयोग चौधरी व कनिष्ठ निवासी डॉ़ कल्पना धनकवार यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.