लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश १५ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. या दरम्यान पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी विनाकारण संचार करण्यास बंदी असणार आहे. यात नवीन कुठल्याही आदेशाचा समावेश नसल्याचेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदी, संचारबंदी जारी केली. प्रवासी वाहतुकीवर बंधने लादली. ही बंधने धुडकावणाऱ्यांसह आरोग्य विभागाने गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचना अमान्य करणारे, मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात सुरुवात केली. गेल्या वर्षी जूनपासून अनलॉकचा टप्पा सुरू होताच, टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. अशात मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदीचे आदेश १५ सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. यादरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनाच मुभा देण्यात आली आहे.