लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेस्टॉरंटचा खरा व्यवसाय रात्री ८ वाजल्यानंतर सुरू होतो आणि रात्री ८ पासून सुरू होणारी संचारबंदी उद्योग बंद करण्यास कारणीभूत ठरणार आहे. सध्याचे निर्बंध आणि घरून काम करण्याच्या सुविधेमुळे रेस्टॉरंटला दिवसा फार काही व्यवसाय होत नाही. त्यामुळे दिलासादायक निर्णय घ्या, अशी विनंती फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने राजय सरकारला केली आहे.
फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एफएचआरएआय) आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्लूआय) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. उद्योगासाठी तत्काळ काही उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्यात उत्पादन शुल्क परवाना, मालमत्ता कर माफी यासह रेस्टॉरंटसाठी संचारबंदीच्या वेळेतून सूट या मागण्यांचा समावेश आहे.
एफएचआरएआयचे उपाध्यक्ष गुरबक्ष सिंग कोहली म्हणाले की, कोरोनाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम झाला आहे. मात्र हॉस्पिटॅलिटी यामुळे खूपच विस्कळीत झाला आहे. कोरोनाच्या महामारीचा सर्वाधिक फटका हॉस्पिटॅलिटी उद्योगाला बसला आहे. मागील वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर उद्योगाचा सर्व व्यवसाय ठप्प झाला. सर्वात पहिला फटका या उद्योगाला जाणवला आणि पूर्ववत व्हायला सर्वाधिक वेळही लागणार आहे. आजघडीला देशातील ३० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट आर्थिक नुकसानीमुळे पूर्णपणे बंद झाले आहेत. लॉकडाऊननंतर २० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्णपणे उघडलेले नाहीत आणि उर्वरित ५० टक्के नुकसानीत सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीतील अव्यवहार्यता राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग बंद करेल आणि मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार होतील. या परिणामांचा विचार करण्याची विनंती करतो आणि रेस्टॉरंटसाठी संचारबंदीच्या वेळेतून सूट द्यावी, अशी मागणी कोहली यांनी केली आहे.
.............................
कोरोनामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योग संकटात आहे. सरकारकडून विशेष अशी कुठलीही मदत पुरवण्यात आलेली नाही. राज्य सरकारकडून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा नवा आदेश या क्षेत्राला आणखी संकटात घेऊन गेला आहे. यामुळे या क्षेत्राचे पुनरुज्जीवन अगदीच अशक्य कोटीतील गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे सरकारने लगेच काहीतरी दिलासादायक निर्णय जाहीर करावा.
- प्रदीप शेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया