Join us

भानगड नकाे म्हणून १० जुलैपर्यंत जमावबंदी; सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:07 AM

यामध्ये लग्न समारंभ, अंत्यविधी, कंपनी, सोसायटी बैठका, सामाजिक, क्लब, संस्थांच्या बैठका/ उपक्रमांना वगळण्यात आले आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामकाजाच्या ठिकाणच्या गर्दीला यातून वगळण्यात आले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या अन्य आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व पोलीस उपआयुक्त यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबईत १० जुलैपर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचे  प्रतिबंधात्मक आदेश पाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या.मुंबई पोलीस प्रवक्ते संजय लाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावबंदी ही नियमित प्रक्रिया असून, १० जुलैपर्यंत आदेश लागू राहतील. या दरम्यान पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई आहे. तसेच कोणीही तोडफोड किंवा आक्षेपार्ह पोस्ट करू नये, असेही पोलिसांच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, मंत्री, खासदार, आमदार व महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने, शाखा अशा ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.  

महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवलीशहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांनी सजग राहून कर्तव्य बजावणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पांडे यांनी दिला. पोलिसांकड़ून वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान आणि दादरमधील शिवसेना भवन यासोबतच मंत्रालय आणि राजभवनासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांमध्येही सुरक्षा वाढविण्यात आली असून, भाजप नेत्यांच्या निवासस्थानांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. 

येथे जमावबंदी नाही -यामध्ये लग्न समारंभ, अंत्यविधी, कंपनी, सोसायटी बैठका, सामाजिक, क्लब, संस्थांच्या बैठका/ उपक्रमांना वगळण्यात आले आहे. चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामकाजाच्या ठिकाणच्या गर्दीला यातून वगळण्यात आले आहे.

शिवसेना भवनाबाहेर  विशेष बंदोबस्तशिवसेना भवनबाहेर कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याच्या सूचनेमुळे दुपारपासून कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. वाढणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीमुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :पोलिसमुंबईशिवसेना