१०० कोटी वसुली टार्गेट प्रकरण; उच्च न्यायालयात आज हाेणार सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून १०० कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आराेपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेने (सीबीआय) प्राथमिक चौकशी केली असून, या चाैकशीची माहिती ते मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करतील, असे शक्यता सूत्रांंनी वर्तवली.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाबाबत त्यांची सखोल चौकशीची मागणी केली जाते, की त्यांना क्लीनचिट दिली जाते, याबद्दल राजकीय व पोलीस वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. सीबीआयच्या निष्कर्षाचे राज्याच्या राजकरणावर मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसूल करून द्यायला सांगितले होते, असा आरोप लेटरबॉम्बद्वारे केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत ॲड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंग व अन्य एकाने दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना कोर्टाने पाटील यांची याचिका ग्राह्य धरत सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले.
सीबीआयने या प्रकरणात देशमुख, परमबीर सिंग, सचिन वाझेसह सर्व संबंधितांचे जबाब नोंदविले आहेत. त्याच्या आधारे प्राथमिक चौकशीची सविस्तर माहिती तयार करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे सीबीआय न्यायालयात आपली भूमिका मांडेल.
................................