मुंबई : कोरोना विषाणूविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूबाबत दोन लसींना मान्यता दिली आहे. मुंबईमध्ये लस प्राप्त होताच पुढील २४ तासात लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. हा पहिला टप्पा पंधरा दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. यासाठी प्रतिदिन १२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली.
मुंबई पालिकेने लसीकरणासाठी ब्लू प्रिंटवर अखेरचा हात फिरवला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. तसेच, खासगी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनादेखील निर्धारित केंद्रावर लस दिली जाणार आहे. पालिकेकडून त्यासाठी विशेष पथके तयार केली जातील.
लसीकरणासाठी आठ केंद्रे सज्ज आहेत, या लसीकरण केंद्रांपैकी केईएम, नायर, कूपर आणि सायन रुग्णालयात दररोज दोन हजार लोकांना लस देण्याचे नियोजन आहे. तर भाभा रुग्णालय (वांद्रे), व्ही.एन. देसाई हॉस्पिटल (सांताक्रूझ), राजावाडी हॉस्पिटल (घाटकोपर) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल (कांदिवली) या उर्वरित चार केंद्रांवर दररोज प्रत्येकी एक हजार लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण १२ ते १५ दिवसांत पूर्ण व्हावे, यासाठी मनपाने नियोजन केले आहे. त्यासाठी २ हजार २४५ पॅरामेडिकल स्टाफची एकूण ५०० पथके तैनात आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
लस घेण्याविषयी सकारात्मक
वरिष्ठ परिचारिका, केईएम रुग्णालय
लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले आहे, याचा आनंद आहे. त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात काम केल्यानंतर प्रतिबंधक लस घेण्यासाठी उत्सुकता असून यानंतर या आजाराशी लढण्याचे बळी आणखी वाढेल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या सामान्यांनाही लसीकरणात सहभागी करून घेण्यात यावे.
लसीकरणाविषयीच्या चुकीच्या समजूती, अफवा दूर सारा
- डॉ. अविनाश भोंडवे, आयएमए, अध्यक्ष महाराष्ट्र
लसीकरणाविषयी जागतिक स्तरावरून कानावर येणाऱ्या बातम्या, चर्चांमुळे सामान्यांसह सर्वांच्याच मनात लसीकरणाविषयी साशंकता आहे. यंत्रणांच्या माध्यमातून या चुकीच्या समजुती, गैरसमज दूर करायला हवेत. संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आणायचा असेल, तर लसीकरण नियोजित प्रकारे व्हायला हवे. या पूर्ण प्रक्रियेला वैद्यकीय आधार आहे व त्याचे विश्लेषणही केले जात आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण होणे गरजेचे आहे.