मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांबाबत उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:58 AM2020-02-25T03:58:42+5:302020-02-25T03:59:00+5:30
साडेचार वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईचे आयुक्तपद हे महासंचालक दर्जाचे केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार तोच दर्जा कायम ठेवते की, पूर्वीप्रमाणे अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करते, याचीही चर्चा रंगली आहे.
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत संपण्यास आता अवघ्या पाच दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे त्यांचा वारसदार म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते, याबाबत पोलिसांसह नागरिकांमध्ये उत्सुकता असून विविध तर्क वर्तविले जात आहेत.
साडेचार वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईचे आयुक्तपद हे महासंचालक दर्जाचे केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार तोच दर्जा कायम ठेवते की, पूर्वीप्रमाणे अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करते, याचीही चर्चा रंगली आहे.
मुंबई आयुक्तपदासाठी एसीबीचे परमबीर सिंग यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याशिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार होमगार्डचे महासमादेशक संजय पांडेय, पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक बिपिन बिहारी, कारागृहचे सुरेंद्र्र पांडेय, राज्य सुरक्षा महामंडळाचे के. कनकरत्रम आणि विधी व तंत्रचे हेमंत नागराळे यांचा क्रम आहे.
परमबीर सिंग हे एसीबीची धुरा सांभाळण्यापूर्वी रजनीश सेठ यांच्या जागी आणि त्यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गॅँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक करण्यात आली. त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली असून, तो अद्यापही कारागृहात आहे. त्याशिवाय त्यांनी अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामध्ये सध्या परदेशात स्थायिक असलेली सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी तिच्यासह तिच्या पतीवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परमबीर सिंग यांच्या (पान १० वर)
परमबीर सिंह यांचे पारडे जड
मुंबईतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी अनुभवी परमबीर सिंह हे संयुक्तिक ठरू शकतात. त्यांचा एकंदर आवाका लक्षात घेता त्यांचाच या जबाबदारीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, अशी शक्यता आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे. सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाºयांमध्येही परमबीर सिंग यांचेच नाव प्राधान्यक्रमावर असल्याचे चित्र पाहायला मिळते.