कोरल सॉफ्टवेअर वापरून घरीच छापत होता चलनी नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:49+5:302021-03-26T04:06:49+5:30
एकाला खेरवाडी पोलिसांकडून अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: कोरल सॉफ्टवेअरचा वापर करत घरातच बनावट चलनी नोटा छापणाऱ्या ठगाला ...
एकाला खेरवाडी पोलिसांकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरल सॉफ्टवेअरचा वापर करत घरातच बनावट चलनी नोटा छापणाऱ्या ठगाला गुरुवारी खेरवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जवळपास १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या नोटाही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
राहुल छाडवा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खेरवाडी पोलिसांनी मिळालेल्या 'टीप' नुसार २३ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वांद्रे पूर्वच्या हंसभृंगा जंक्शनजवळ एक इसम बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने छाडवा याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्या घराच्या झडतीत त्यांना ५० व १०० रुपयांच्या एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा सूर्यवंशी यांनी हस्तगत केल्या, तसेच या नोटा छापण्यासाठी तो वापरत असलेले प्रिंटर, कलर काटरेज, छपाई कागदाची रील व बारीक तारेचे बंडलही त्यांनी ताब्यात घेतले. ही सगळी कारवाई परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे आणि खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.