सध्याच्या घटना सोशल मीडियातील चुकीच्या माहितीमुळे - उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:35 AM2020-01-28T05:35:58+5:302020-01-28T05:38:50+5:30
सर्वांशी चर्चा करा. लोकांना त्यांची मते व कल्पना मांडता येतील, असे वातावरण निर्माण केले तर चुकीची माहिती जाणार नाही व गैरसमजही होणार नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले.
मुंबई : विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्या. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालाल तर ते सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध होतील. सध्या जे घडत आहे ते सोशल मीडियातील चुकीच्या माहितीमुळे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली.
सर्वांशी चर्चा करा. लोकांना त्यांची मते व कल्पना मांडता येतील, असे वातावरण निर्माण केले तर चुकीची माहिती जाणार नाही व गैरसमजही होणार नाहीत, असेही न्यायालयाने सांगितले. आनंद पटवर्धन व पंकज कुमार यांच्या तीन लघुपटांना चित्रपट महोत्सवात प्रवेश न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर सुनावणी झाली. प्रदीर्घ युक्तिवादानंतर आनंद पटवर्धन व पंकज कुमार यांनी ही याचिका मागे घेतली.
माहितीपट नाकारण्याचे केंद्राच्या चित्रपट विभागाने कारण दिले नाही, असे याचिकेत म्हटले होते. त्यावर अॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले की, निवड समितीतील तज्ज्ञांनी माहितीपट पाहिल्यानंतरच प्रवेश नाकारला. त्यात केंद्राची कोणतीही भूमिका नाही. विरोधकांची भूमिका न स्वीकारून देशाचे अधिक नुकसान करू नका. सरकारच्या विरोधात आवाज उठवत असल्याने लक्ष्य केले जात असल्याचे त्यांना वाटते. भविष्यात जर सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चित्रपट काढण्यात आला तर तुम्ही त्यावर बंदी घालाल. परंतु, त्यानंतर त्याला प्रसिद्ध मिळेल, असे न्यायालयाने उदाहरण देऊन केंद्र सरकारला समजावले.
उद्या एखाद्याने नक्षलीसंबंधी चित्रपट काढला तर तुम्ही त्याच्यावर बंदी घालण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अशा प्रकारे (बंदीने) समस्या सोडविणार असाल, तर ते मान्य नाही. सध्याच्या सरकारने असे दर्शविले आहे की, जे काही त्यांच्या विरोधात आहे ते सार्वजनिक होऊ देणार नाही, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. आता माहितीपटाची संकल्पना बदलली आहे. याआधी माहितीपट हे केवळ सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी असायचे, मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पंकज कुमार यांचा ‘जनानीज् ज्युलिएट’ या चित्रपटाने इंडियनोस्ट्रम थिएटरची (पुडुच्चेरीचा थिएटर ग्रुप) कथा सांगितली आहे. हा ग्रुप देशातील आॅनर किलिंगच्या घटनेने अस्वस्थ आहे. जात, वर्ग आणि लिंग यामुळे होणारे परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्यात आले आहेत. त्यांच्या ‘टू फ्लॅग्स’ या चित्रपटात पुडच्चेरीतील राजकीय स्थिती व सामान्यांचे जीवन यांवर आधारित आहे.
काय आहे माहितीपटात?
आनंद पटवर्धन निर्मित ‘विवेक/रिझन’ माहितीपटात एका राजकीय विचारसणीविषयी भाष्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या आणि या हत्यांचा एका संस्थेशी असलेला संबंध, याची माहिती आहे. गोमाता रक्षणार्थ मुस्लीम व दलितांवर झालेले हल्ले, जातीवरून भेदभावामुळे रोहित वेमुलाची आत्महत्या आणि सध्या देश ज्या छोट्या-मोठ्या हिंसाचाराचा साक्षीदार आहे, त्याचा आढावा यात आहे.