सध्याच्या राजकारणातून राजकीय सभ्यता लोप पावतेय, राम नाईक यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 02:09 AM2019-08-16T02:09:21+5:302019-08-16T02:10:16+5:30
राजकारणात पूर्वी असलेली सभ्यता सध्याच्या राजकारणातून लोप पावत चालली आहे, अशी खंत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केली.
मुंबई : राजकारणात पूर्वी असलेली सभ्यता सध्याच्या राजकारणातून लोप पावत चालली आहे, अशी खंत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केली. मुंबई पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे अध्यक्षस्थानी होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्या वेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित करण्यात आले होते. अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते. मात्र अत्रे यांनी निमंत्रण स्वीकारले होते. पण आज जर अशी परिस्थिती आली तर काय होईल याचा विचारही करता येत नाही. अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदान फार महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे ‘केसरी’च्या संपादकीयमध्ये लोकमान्य टिळक काय लिहिणार याची उत्सुकता जनसामान्यांत असायची तशीच उत्सुकता ‘मराठा’मध्ये अत्रे काय लिहिणार याची असायची. अत्रे यांच्यासारखा वक्ता १० हजार वर्षांत होणार नाही, असे प्रतिपादन नाईक यांनी केले.
अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळालेले राधाकृष्ण नार्वेकर यांनी नेहमीच समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आंदोलनात संपादकाच्या खुर्चीबाहेर जाऊन नार्वेकर यांनी काम केले. मात्र तसे करताना आपल्या संपादकीय कामाकडे दुर्लक्ष केले नाही. संपादकीयमधून मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कामात नार्वेकर यांचे श्रेय फार मोठे आहे. नार्वेकर संपादकीयमधून राजकीय नेत्यांना न बोचणारे अलगद चिमटे काढत, असे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होते, असे कौतुक नाईक यांनी केले. ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे नार्वेकर यांचे पुस्तक इतर भाषांत भाषांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात ज्येष्ठांचे प्रश्न फार गंभीर आहेत. त्याकडे लक्ष देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नाईक म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, आचार्य अत्रे यांच्यासारखा वक्ता आणि पत्रकार १० हजार वर्षांत होणार नाही. त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतो याचा मला अभिमान आहे. सार्वजनिक क्षेत्रात पोटतिडकीने काम करणारा व नखशिखांत प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणजे राम नाईक. अशा प्रामाणिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा पुरस्कार दिला याचा अधिक आनंद आहे, असे ते म्हणाले.
संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी नार्वेकर यांचा परिचय करून दिला. त्यांचे राम नाईक यांनी आवर्जून कौतुक केले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षकांनी केले मोलाचे मार्गदर्शन
माझ्या या प्रवासात मला शालेय काळात लाभलेल्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत खरेपणा व समाजात नाही रे वर्ग आहे तोपर्यंत पत्रकारिता टिकून राहणार, असे मत पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहाबाबत नार्वेकर यांनी व्यक्त केले.