सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण

By admin | Published: October 14, 2015 03:12 AM2015-10-14T03:12:19+5:302015-10-14T03:12:19+5:30

देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले असून सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण

The current status is grueling from the emergency | सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण

सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण

Next

मुंबई : देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारला परत केले असून सद्यस्थिती आणीबाणीहून भीषण असल्याचे उद्वेग्जनक उद्गार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात काढले आहेत.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सद्यस्थितीचे अचूक वर्णन करणारे आहे. त्या म्हणतात, एका अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून आपण सगळेच सध्या जात आहोत. १९७५ मधील आणीबाणीपेक्षाही सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचे कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनरहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधाऱ्यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे. अतिशय बीभत्स, ओंगळवाणं असं आजचं सार्वजनिक चर्चाविश्व झालेलं आहे. मोहम्मद अखलाकची झालेली हत्या आणि लव्हजिहाद, घरवापसीसारख्या मोहिमामुळे मन अस्वस्थ झाले आहे. विवेकाच्या आवाजाला प्रत्युत्तर देता येत नसेल, तर विवेकी व्यक्तींची दिवसाढवळ्या हत्या करण्यापर्यंत परिस्थिती बिघडली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या, कोणताही वेगळा विचार खपवून घेतला जाणार नाही, हेस्पष्ट करणाऱ्या आहेत.
लेखक-कलावंतांच्या मूलभूत अधिकाराचा मुद्दा अधोरेखित करीत असताना सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरच विद्यमान शासनव्यवस्थेकडून घाला घातला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेले आजवरचे सर्व शासकीय पुरस्कार, पुरस्कारांच्या रक्कमेसह शासनाला परत करीत आहे, असे शेवटी त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जगणं कठीण होत आहे
मुद्दा केवळ लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, त्यांच्या जीवितांच्या सन्मानपूर्ण रक्षणाचा नाही. तो तर आहेच, पण मी ज्या महाराष्ट्रात- भारतात राहते तिथली सर्वसामान्य माणसेही जीव मुठीत धरून कसंबसं जगत आहेत. जमातवादाचं विष जाणीवपूर्वक देशभर पसरवलं जात आहे. काय खावं, प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेष परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं इथपासून भयाचं एक अनामिक सावट घेऊन जगणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत.

Web Title: The current status is grueling from the emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.